Monsoon Update : राज्यात माॅन्सून सक्रिय

राज्यात सोमवारपासून माॅन्सून सक्रिय झाला. राज्यातील बहुतांश भागांत पावसाने हजेरी लावली. कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक होता.
Monsoon
MonsoonAgrowon

पुणेः जून महिन्यात पावसाने शेतकऱ्यांची कसोटीच लावली. मात्र आता राज्यात माॅन्सून सक्रिय (Monsoon Activate) झाला. त्यामुळे सोमवारपासून राज्यातील बहुतेक भागांत जोरदार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली. मंगळवारी दुपारपर्यंत अनेक ठिकाणी पावसाचा जोर (Rain Force) कायम होता. तर पुढील चोवीस तासांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिजोरदार पावसाचा अंदाज (Rain Prediction) हवामान विभागाने वर्तविला. तसेच विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला.

राज्यात सोमवारपासून माॅन्सून सक्रिय झाला. राज्यातील बहुतांश भागांत पावसाने हजेरी लावली. कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक होता. कोकणात सोमवारी पहाटेपासून पावसाची संततधार सुरु होती. त्यामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शुक नदीने धोक्याची पातळी ओलांडली. कणकवली तालुक्यातील खारेपाटण शहराला पुराच्या पाण्याने वेढले. काही घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे कुटुंबाचे स्थंलातर करण्यात आले आहे.

पुराच्या पाण्याने भातशेतीचे मोठे नुकसान झाले. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी, काजळी, अर्जुना नदीला पूर आला. त्यामुळे किनाऱ्यावरील गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला. किनारी भागातील भातशेती पाण्याखाली गेली आहे. जगबुडी नदीने इशारा पातळी सोडली. खेड शहरातील मच्छीमार्केट परिसरात पाणी होते. मंगळवारीही कोकणात पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे पूरस्थिती आणखी गंभीर बनण्याची शक्यता आहे.

पुणे जिल्ह्यात सोमवारपासून पावसाने जोर धरला. तर मंगळवारी अनेक भागांत संततधार सुरु होती. धरणक्षेत्रांत पावसाचा जोर अधिक होता. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. मंगळवारी दुपारपर्यंत बहुतांश ठिकाणी संततधार पाऊस सुरू होता. धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस पडत असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली. ‘पंचगंगे’सह अन्य नद्यांचे पाणी हळूहळू वाढत आहे. पंचगंगेवरील १५ बंधारे मंगळवारी दुपारी बारा वाजेपर्यंत पाण्याखाली गेले. सांगली जिल्ह्यातही मंगळवारी पहाटेपासून मिरज, वाळवा, शिराळा, पलूस, कडेगाव या तालुक्यांत पावसाची रिमझिम सुरू होती. सातारा जिल्ह्यातही सोमवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली होती. तर मंगळवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला होता. विदर्भात सोमवारी आणि मंगळवारीही चांगला पाऊस झाला. वऱ्हाडात या मोसमातील पहिला सार्वत्रिक पाऊस गेल्या २४ तासांत पडला. प्रत्येक तालुक्यात कमीअधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली.

मराठवाड्यातही बहुतेक ठिकाणी पाऊस झाला. तर ठिकठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ८१ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला. कमी पावसावर पेरण्या केलेल्या पिकांना पाण्याची गरज होती. आता या पावसामुळे पिके तग धरतील आणि रखडलेल्या पेरण्याही जोर धरतील, असे जाणकारांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com