मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापला

१६ जून रोजी मोठी मजल मारून संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व्यापत गोंदियापर्यंत धाव घेतली. तर रविवारी मॉन्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. नियमित वेळेनुसार साधारणतः: १५ जून रोजी मॉन्सून सर्व राज्यात पोचतो.
मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापला
MonsoonAgrowon

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) रविवारी (ता.१९) उर्वरित विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. तसेच गुजरात, मध्य प्रदेशच्या आणखी काही भागात मॉन्सूनने प्रगती केली आहे. दरम्यान कोकणासह राज्याच्या घाटमाथ्यावर मॉन्सून सक्रिय झाला असून, मुंबईसह कोकणात पावसाला सुरुवात झाली आहे.

केरळात वेळेआधी पोचून ३१ मे पर्यंत गोव्याच्या उंबरठ्यावर दाखल झाल्यानंतर तब्बल १० दिवसांनी मॉन्सूनने कोकणात प्रवेश केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी (११ जून) बहुतांशी कोकण, मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भागात मॉन्सून दाखल झाला. १३ जून रोजी मॉन्सूनने संपूर्ण कोकणासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या बहुतांश भागापर्यंत टप्पा गाठत निम्म्या महाराष्ट्र व्यापला.

१६ जून रोजी मोठी मजल मारून संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व्यापत गोंदियापर्यंत धाव घेतली. तर रविवारी मॉन्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. नियमित वेळेनुसार साधारणतः: १५ जून रोजी मॉन्सून सर्व राज्यात पोचतो. यंदा चार दिवस उशिराने मॉन्सून राज्यात सर्वदूर दाखल झाला आहे.

मॉन्सूनने गुजरात, मध्य प्रदेशच्या आणखी काही भागासह छत्तीसगड, पश्चिम बंगाल झारखंड बिहारच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे. पोरबंदर, बडोदा, इंदूर, उमरिया, कलिंगपट्टम, दिघा, पटना पर्यंतच्या भागात मॉन्सून पोहोचला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेशमध्ये मॉन्सूनची प्रगती होण्यास पोषक हवामान आहे.

देशात बहुतांश भागात मॉन्सूनची प्रतीक्षा

देशातील बहुतांश भागात अद्याप मॉन्सूनची हजेरी लागलेली नाही. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांनी म्हणावा तसा वेग घेतलेला नाही. आतापर्यंतच्या सरकारी आकडेवारीनुसार खरीप लागवडीत घट दिसून आली आहे. पेरण्यांसाठी शेतकऱ्यांच्या नजरा आता पावसाकडे लागलेल्या आहेत.

कोकण, मुंबईत पावसाचे आगमन

रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी पहाटेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. मॉन्सून दाखल झाला असला तरीही पाऊस अजून स्थिरावलेला नसल्याने बळीराजा त्रस्त आहे. मध्यरात्री सरी पडल्यानंतर पहाटेच्या सुमारास सुमारे एक तासाहून अधिक काळ पाऊस झाला. मात्र त्यानंतर पावसाने उघडीप दिली. सिंधुदुर्गासह मुंबईतही देखील रविवारी पावसाने हजेरी लावल्याची माहिती मिळाली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com