एकोणीस हजार हेक्टरवर अजूनही ऊस शिल्लक

नगर जिल्ह्यातील स्थिती, ऊसगाळपाचा प्रश्‍न गंभीर
Sugarcane
SugarcaneAgrowon

नगर ः नगर जिल्ह्यासह राज्यभरातील बहुतांश कारखान्याचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आहे. मात्र नगर जिल्ह्यात अजून सुमारे १९ हजार २०४ हेक्टरवर १३ लाख ७३ हजार टन ऊस शिल्लक असल्याचा प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाचा अहवाल आहे. मात्र, जाणकारांच्या म्हणण्यानुसार १८ ते १९ लाख टन ऊस शिल्लक आहे.

उसाची तोड होत नाही, साखर कारखाने बंद होत असल्याने ऊस उत्पादक शेतकरी मात्र पुरते हवालदिल झाले आहेत. सध्या सुरू असलेल्या कारखान्यातून ऊसतोडणी होणार असली तरी सात ते आठ लाख टन ऊस तसाच शेतात उभा राहण्याचा जाणकारांचा अंदाज आहे.

नगर जिल्ह्यातील शिल्लक उसासंदर्भात नुकतीच बैठक झाली. त्यात नगर व नाशिक जिल्ह्यात अजून सुमारे १९ हजार २०४ हेक्टरवर १३ लाख ७३ हजार टन ऊस शिल्लक असल्याचा प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाचा अहवाल आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख २७ हजार हेक्टरवरील १ कोटी ७२ टन उसाचे गाळप झाले आहे. अजून जिल्ह्यात जिल्ह्यातील १५ हजार ०१९ हेक्टरवर १० लाख ५२ हजार तर जिल्ह्याबाहेरील ४ हजार १७२ हेक्टरवर ३ लाख २१ हजार टन उसाचे गाळप होईल, असे अहवालात नमूद आहे. जिल्ह्यात सध्या दोन हजार मजुरांच्या टोळ्या, ३१ हजार कामगार, ५ हजार ९०० टायरगाड्या, २ हजार ७०० टॅक्टर आणि ११३ हार्वेस्टर उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे.

ऊसतोड मजुर हे मूळ शेतकरी आहे. सध्या मात्र उन्हाची तीव्रता अधिक आहे. शिवाय खरीप हंगामही जवळ आल्याने शेतीची कामे उरकण्यासाठी मजुरांनी घर गाठायला सुरुवात केली आहे. आता काही कारखान्यांनी स्थानिक मजुरांना पुढे करून ऊसतोडणीचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. मात्र कारखान्यांनी ऊसतोडणी केली तरी शिल्लक ऊस पाहता सुमारे ७ ते ९ लाख टन ऊस शेतातच उभा राहण्याची भीती जाणकार व्यक्त करत आहेत. त्यामुळे नगर मात्र शिल्लक उसाचा प्रश्‍न वरचेवर गंभीर होत आहे.

कृषी विभागाची जबाबदारी काय

नगर जिल्ह्यात कृषी विभागाने ऊस उत्पादक शेतकरी अक्षरशः वाऱ्यावर सोडल्याची स्थिती आहे. जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून शिल्लक उसाचा प्रश्‍न आहे. जिल्ह्यात किती ऊस उपलब्ध आहे. साधारणपणे उत्पादन किती निघेल, सध्या किती क्षेत्रावर ऊस उभा आहे याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे असणे आवश्यक आहे. मात्र जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या उदासीनतेमुळे अशी कोणतीही माहिती कृषी विभागाकडे उपलब्ध नाही. कृषी विभागाचे अधिकारी साखर सहसंचालक कार्यालयाकडे जबाबदारी ढकलून मोकळे होत आहेत.

शेतातील ऊसतोडणी म्हणजे, सत्त्वपरीक्षा आहे. आमचा नोव्हेंबरमधील ऊस आता म्हणजे पाच महिने उशीर झालाय. आज-उद्या तोडणी होणार या आशेने दीड महिन्यापासून पाणी दिले नाही. आता उत्पादन सोडा, खर्चही निघणार नाही. मुळात सरकार, सहकार विभागाचे धोरणच चुकीचे आहे.
- सुदामराव औताडे, प्रगतिशील शेतकरी, माळेवाडी, ता. श्रीरामपूर, जि. नगर
साखर कारखाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत. मजुरांनी घर गाठले आहे. मात्र, अजूनही लाखो टन ऊस शेतात उभा आहे. ज्या शेतकऱ्यांचा ऊस तुटणार नाही त्यांना प्रती हेक्टरी एक लाखाची भरपाई द्यावी, अशी आमची मागणी असून यासाठी शेतकरी संघटना न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे.
- अनिल औताडे, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना, नगर जिल्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com