
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासह ( Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University) शहर व जिल्ह्यातील ३७ अनुदानित महाविद्यालयातील ७५० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयांच्या गेटवर निदर्शने केली. तर विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनीही घोषणाबाजी केली.
सहा मागण्यांसाठी २ फेब्रुवारीपासून हे आंदोलन सुरु असतानाही तेरा दिवसानंतरही सरकारकडून काहीच तोडगा काढण्यात आलेला नाही.
सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेसंबंधीचे शासन निर्णय पुनर्जीवित करून पूर्ववत लागू करावेत, सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार १०.२०.३० वर्षानंतरच्या लाभाची योजना विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करावी, सातव्या वेतन आयोग न मिळालेल्या एक हजार ४१० कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ द्यावा, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ ते प्रत्यक्ष सातवा वेतन लागू झाल्याच्या कालावधीपर्यंत वेतनाचा फरक द्यावा, विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरावीत, जुनी पेन्शन योजना लागू करावी
आणि विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी लागू करावी अशा प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु आहे. परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकल्यावर सरकारने यापूर्वी आश्वासित केलेल्या मागण्यांवर निश्चितपणे मार्ग निघेल, असा विश्वास कर्मचाऱ्यांना होता. पण, अद्याप मार्ग निघालेला नाही.
आमदारांना निवेदने देऊनही निघेना मार्ग
उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट संबंध असलेले आणि त्यांचे निकटवर्तीय समजले जाणारे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील व आमदार राम सातपुते यांना विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी मागण्यांचे निवेदन दिले.
त्यांनी उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्याची ग्वाही दिली होती. पण, अद्याप कर्मचाऱ्यांच्या आंदोलन मिटविण्याच्या अनुषंगाने सरकारने ठोस पाऊल उचललेले नाही.
त्यामुळे हे आंदोलन आणखी किती दिवस असेच सुरु राहणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.