
NAFED Onion Procurement नाशिक : ‘नाफेड’च्या कथित कांदा खरेदीतील (Onion Procurement) निकष, खरेदी केंद्रांची शेतकऱ्यांना माहिती नाही. ज्या ठिकाणी खरेदी सुरू आहे, त्या शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या (Onion Production Cost) खाली दर आहेत.
पेमेंटलाही उशीर होत आहे. एकंदरीतच या खरेदीने ना बाजारपेठांवर, दरावर (Onion Rate) दबाव निर्माण होत होत आहे,
ना ‘नाफेड’च्या खरेदीची (NAFED) व्यापकता वाढली जात आहे, या खरेदीचा आम्हाला कुठला दिलासा मिळत नाही, केवळ गाजावाजा सुरू असल्याच्या संतप्त तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत.
लेट खरीप कांद्याची नाशिक जिल्ह्यातील बाजार आवारात आवक कमी होऊनही दरात कमालीची घसरण आहे. प्रतिकिलो सरासरी अवघा ४ ते ५ रुपये दर मिळत आहे.
त्यात उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी आंदोलने केली. याप्रश्नी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच गदारोळ झाला.
त्यावर अखेर केंद्र सरकारने हस्तक्षेप करत ‘नाफेड’च्या माध्यमातून कांदा खरेदी सुरू केली.
मात्र या खरेदीत निकष, खरेदी केंद्राची माहिती नाही. ज्या ठिकाणी खरेदी सुरू आहे, त्या शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या खाली, म्हणजेच ८ ते ९ रुपये प्रतिकिलो आठ दिवसांनंतर ‘नाफेड’कडून पेमेंट आल्यावर खरेदीदार असलेल्या शेतकरी उत्पादक कंपनी महासंघ यांच्यामार्फत थेट खात्यावर मिळणार आहे.
त्यामुळे एकंदरीतच कुठलाही दिलासा कांदा उत्पादकांना मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे नाफेड कांदा खरेदी म्हणजे नुसता गाजावाजा असल्याचा प्रकार समोर आला आहे.
कांद्याचे दर घसरल्यानंतर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना निवेदन देत वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली होती.
त्यानंतर फेब्रुवारीअखेर जिल्ह्यात सहा ते सात शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या महासंघामार्फत ८ केंद्रांवर खरेदी झाल्याचे जाहीर करण्यात आले.
ही केंद्र कुठे आहेत? याबाबत व्यापक जनजागृती नसल्याने सर्वसामान्य शेतकरी या खरेदीचा लाभ घेऊ शकत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
एकीकडे प्रति किलो कांद्याला उत्पादन खर्च हा अकरा रुपयांवर असताना ही खरेदी उत्पादन खर्चाच्या खाली होत असल्याने या योजनेचा शेतकऱ्यास नेमका फायदा काय हा सवाल उपस्थित होत आहे.
जिल्ह्यात दररोज १ ते १.५ लाख क्विंटल बाजार आवारात कांदा खरेदी होत आहे. त्यापैकी ४ ते ५ हजार क्विंटल कांदा नाफेड खरेदी करत असल्याने हे प्रमाण अत्यल्प आहे. त्याची माहिती कुठेही लवकर उपलब्ध होत नाही. मात्र सध्या खरेदी केलेला कांदा त्याच दिवशी दिल्लीमध्ये पाठविण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
...अशी आहे खरेदीची स्थिती :
- शेतकऱ्याकडून प्रतिहेक्टर १५६ क्विंटलपेक्षा जास्त खरेदी होऊ शकत नाही.
- कांदा विक्री करताना आधार कार्ड व बँक पासबुक झेरॉक्स, ७/१२ कांदा खरीप हंगाम पीकपेरा लागलेला हवा. ही सर्व कागदपत्रे स्वतःची सही करून जमा करणे आवश्यक.
- लाल रंग असलेल्या कांद्याचा आकार ४५-६५ मिमी असावा.
- विळा लागलेला, कोंब फुटलेला, पत्ती निघालेला, आकार बिघडलेला, मुक्त बेले असलेला, रंग गेलेला, नरम मऊ कांद्याची खरेदी नाही.
‘नाफेड’चा नेमका फायदा होणार कसा?
जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये गुणवत्तापूर्ण कांद्यांना प्रातिनिधिक स्वरूपात का होईना हजार रुपयांच्या जवळपास दर मिळत आहेत. मात्र ‘नाफेड’कडून सर्व निकषांवर आधारित गुणवत्तापूर्ण कांद्याची खरेदी आठ ते नऊ रुपये प्रतिकिलो दाराने होत आहे.
त्यात उत्पादन घेतलेला संपूर्ण माल घेत नाही.असे असतानाही शेतकऱ्यांना दिलासा दिला जात असल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात ‘नाफेड’चा नेमका फायदा कसा, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आता लाल कांदा संपत आला आहे. त्यामुळे खरेदी कुठे आहे कल्पना नाही, असे शेतकरी सांगत आहेत. याबाबत ‘नाफेड’च्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता तो झाला नाही.
आमच्याकडे कुठल्याही प्रकारची नाफेड खरेदी चालू नाही आहे. फक्त सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केली. आताही आमच्याकडे कांद्याला दर सरासरी ५०० रुपये प्रतिक्विंटल इतका आहे.
- दीपक दाभाडे, कांदा उत्पादक, बोकटे, ता. येवला
कुठल्याही प्रकारची नाफेडची खरेदी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार समिती निफाड येथे नाफेडची खरेदी सुरू नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहे बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
-गणेश चव्हाण, शेतकरी, उगाव, ता. निफाड
‘नाफेड’च्या खरेदीदारांनी व्हॉट्सॲपला पोस्ट बघितली. उद्यापासून लाल कांद्याची खरेदी नाफेड करणार आहे. परंतु भाव वगैरे कुठल्याच प्रकारचा त्यात उल्लेख केलेला नाही.
- संदीप शेवाळे, शेतकरी, खामखेडा, ता. देवळा
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.