
नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे (Heavy Rainfall) नुकसान झालेल्या चार लाख ७३ हजार ५७० विमाधारक शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे (Insurance Company) नुकसानीबाबत ७२ तासात माहिती कळविली होती. यात नुकसानीबाबत पंचनामा झाल्यानंतर नुकसानीच्या प्रमाणानुसार स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकांतर्गत ९७ कोटी ९७ लाख तर काढणीपश्चात नुकसान या घटकांतर्गत तीन कोटी असे एकूण १०१ कोटीचा परतावा मंजूर केल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली.
जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेतंर्गत खरीप हंगाम २०२२ मध्ये युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनीकडे दहा लाख ५७ हजार ५०८ अर्जदार शेतकऱ्यांनी सहा लाख ५१ हजार ४२२ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले होते. यात सोयाबीन, कपाशी, तूर, ज्वारी, उडीद व मुग या पिकांसाठी विमा काढण्यात आला होता. दरम्यान, अनेकवेळा अतिवृष्टीची नोंद झाल्यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे नुकसानीबाबत दावा दाखल करण्याचे, आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. यानुसार जिल्ह्यात चार लाख ७३ हजार ५७० विमाधारक शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत माहिती कळविली होती. यात कंपनीकडून पंचनामा झाल्यानंतर नुकसानीच्या प्रमाणानुसार शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकांतर्गत ९७ कोटी ९७ लाख तर काढणीपश्चात नुकसान या घटकांतर्गत तीन कोटी २८ लाख असे एकूण १०१ कोटी परतावा मंजूर केला आहे. हा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार, असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली.
विविध घटकांतर्गत ४६७.७५ कोटींचा परतावा मंजूर
जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण अधिक असल्याने खरिपातील सव्वापाच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती (मिड सीझन ऍडव्हर्सिटी) घटकांतर्गत शेतकऱ्यांना नुकसानीच्या २५ टक्के भरपाई मिळावी यासाठी अधिसूचना जाहीर केली होती. ही अधिसूचना विमा कंपनीने मंजूर करून सोयाबीन, कपाशी, तूर व ज्वारी या पिकांसाचा विमा भरलेल्या सर्वच शेतकऱ्यांना ३६७ कोटी रक्कम मंजूर केली आहे. यातील ८५ टक्क्यांनुसार ३१० कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. तर शिल्लक १५ टक्क्यांनुसार ५७ कोटी व दावा दाखल केलेल्यांचे १०१ कोटी असे १५८ जमा करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.