नांदेड जिल्ह्यांत सर्वाधिक नुकसान

प्राथमिक अहवालानुसार या पाच जिल्ह्यांत ३ लाख ३८ हजार ८८ हेक्टरवरील शेतीपिकांचे (Crop Damage) नुकसान झाले असून यात एकट्या नांदेड (Nanded) जिल्ह्यातील सर्वाधिक ३ लाख २० हजार ८७९ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.
Natural Calamity
Natural CalamityAgrowon

औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, नांदेड व लातूर जिल्ह्यांत पावसाने (Heavy Rain) नजीकच्या काळात चांगलाच धुमाकूळ घातला. प्राथमिक अहवालानुसार या पाच जिल्ह्यांत ३ लाख ३८ हजार ८८ हेक्टरवरील शेतीपिकांचे (Crop Damage) नुकसान झाले असून यात एकट्या नांदेड (Nanded) जिल्ह्यातील सर्वाधिक ३ लाख २० हजार ८७९ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. तर, तब्बल ३ लाख ५१ हजार ४४९ एकूण पाच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

मराठवाड्यात १ जून ते १५ जुलै दरम्यान १७२ मंडळांत अतिवृष्टी झाली. यात अतिवृष्टी झालेल्या मंडळांमध्ये हिंगोली, परभणीमधील प्रत्येकी २४, नांदेडमधील ८०, उस्मानाबादमधील ५, लातूरमधील १३, जालन्यातील ११, औरंगाबादमधील ८ व बीडमधील ७ मंडळांचा समावेश आहे.

वारंवार अतिवृष्टी झालेल्या मंडळांची संख्या नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ परभणी, हिंगोली, लातूर, बीड, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांतील मंडळांचा क्रमांक लागतो. सततच्या पावसामुळे वापसा नसल्याने पिकाची वाढ खुंटली असून मशागती अभावी शेतात तणांचे साम्राज्य पसरले आहे. एकीकडे शेतकऱ्यांची वापसा येण्यासाठी कसरत सुरू असतानाच अनेक ठिकाणी पिके पिवळी पडून संपण्याचे किंवा सडून गेल्याचे प्रकारही समोर आले आहेत.

आठही जिल्ह्यांत खरिपाच्या सर्वसाधारण ४३ लाख ५७ हजार १५२ हेक्टर क्षेत्रापैकी ८५ टक्के क्षेत्रावर म्हणजे ४१ लाख ४३ हजार ४७८ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. म्हणजे अजूनही अपेक्षित पेरणी झालीच नाही. असे असताना त्यापैकी ३ लाख ३८ हजार ८८ हेक्टर ९१ आर जमिनीवरील शेती पिकाचे नुकसान झाले आहे.

शेती पिकाचे नुकसान (Crop Damage) झालेल्या क्षेत्रामध्ये जालना जिल्ह्यातील ५०.७४ हेक्टर क्षेत्रासह हिंगोली जिल्ह्यातील १५ हजार ९४४ हेक्टर, परभणी जिल्ह्यातील १२०० हेक्टर, नांदेड जिल्ह्यातील ३ लाख २० हजार ८७९ हेक्टर १७ आर तर लातूर जिल्ह्यातील १५ हेक्टरवरील शेती पिकाचा समावेश आहे.

१ जूनपासून आतापर्यंत नैसर्गिक आपत्तीमुळे (Natural Calamity) ३५ व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला. तर, जवळपास २९६ दुधाळ लहान मोठ्या जनावरांनाही या नैसर्गिक आपत्तीत आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय ११८ ओढकाम करणाऱ्या लहान, मोठ्या जनावरांचाही नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झाला आहे. ६८७ कच्च्या व पक्क्या घरांची पडझड झाली असून एका गोठ्याचेही नुकसान झाले आहे.

४७६ हेक्टर शेतजमीन खरडली

नांदेड जिल्ह्यातील २६१ हेक्टर व जालना जिल्ह्यातील २०५ व हिंगोली जिल्ह्यातील १० हेक्टर मिळून ४७६ हेक्टर शेतजमीन खरडून गेली आहे. नांदेड जिल्ह्यातील ७ पूल व ७ रस्ते तसेच बीड जिल्ह्यातील एक पूल मिळून १५ सार्वजनिक मालमत्तांचेही नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले.

जिल्हानिहाय शेतकरी व बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये)

जिल्हा... शेतकरी...नुकसान क्षेत्र

जालना... ३७७... ५०.७४

परभणी... १५००... १२००

हिंगोली... १९१९७...१५९४४

नांदेड... ३३०३५७...३२०८७९.१७

लातूर... १८ ... १५...

जमीन खरडून गेलेले क्षेत्र (हेक्टरमध्ये)

जिल्हा.... खरडलेले क्षेत्र

जालना... २०५

हिंगोली .. १०

नांदेड... २६१

जवळपास पंधरवड्यापासून सतत पाऊस असल्याने शेतीत आंतरमशागतीची काम थांबली. पीक आणि तण सारखच झालं. पिकाची वाढ खुंटली पीकही पिवळी पडली. अजून वाफसा नाही त्यासाठी प्रयत्न सुरू असताना आता पाऊस आला नाही तर बरं होईल.

- धनंजय सोळंके नागापूर, ता. परळी, जि. बीड

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com