न्यायडोंगरी, जि. नाशिक : नार-पार नदीजोड प्रकल्पाला (River Linking Project) दोन महिन्यांत मान्यता मिळणे अपेक्षित आहे. त्यात पश्चिमेला जे ४० टीएमसी (Tmc) पाणी वाहून जाते त्यातील आताच्या ‘डीपीआर’मध्ये दहा टीएमसी पाणी वळविण्याचे प्रयोजन आहे;
मात्र यात नांदगाव तालुक्याचा (Nadgao Tahashil) समावेश होण्याचे अपेक्षित असताना ‘डीपीआर’मध्ये त्याचा उल्लेख नसल्याने तालुक्यात नाराजीचा सूर उमटत आहे.
विपुलतेच्या खोऱ्यातून तुटीच्या खोऱ्यात दुष्काळी भागात पाणी वळविणे हे नदी जोड प्रकल्पाचे मुख्य काम आहे. या योजनेनुसार नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, कळवण, देवळा, मालेगाव या तालुक्यांचा समावेश होता.
नांदगाव तालुका हा अतितुटीच्या क्षेत्रात आहे. त्यामुळे या योजनेत नांदगाव तालुक्यात समावेश व्हावा म्हणून चार वर्षापूर्वी माजी आमदार अनिल आहेर, समाधान पाटील व त्यांचे सहकारी यांनी प्रस्तावित योजनेत ‘डीपीआर’मध्ये तालुक्याचा समावेश व्हावा यासाठी राज्यस्तरावर व केंद्रस्तरावर या विषयाची मुद्देसूद तांत्रिक मांडणी केली होती.
या संदर्भात तत्कालीन केंद्रीय जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांची भेट समाधान पाटील व यांच्या सहकाऱ्यांनी दिल्लीत भेट घेऊन हा विषय त्यांच्या निदर्शनास आणून दिला होता.
तेव्हा केंद्रीय जलसंपदा विभागाचे मुख्य सचिव कार्यकारी अधिकारी सुधीर दिवे यांना गडकरी यांनी यांच्या निर्देशानुसार तत्कालीन राज्याचे जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल व संबंधित अधिकारी वर्गांना निर्देश दिले होते.
यामुळे नांदगाव तालुक्याचा समावेश प्रकल्प अहवालात अंतर्भाव होण्याचा मार्ग खुला झाला होता. श्री. पाटील यांच्या मागणीनुसार ७५ ते ८० गावातील शेती सिंचनाखाली येऊन हा प्रकल्प नांदगाव तालुक्याला वरदान ठरणारा होता.
तालुक्यातील मध्यम व लघु प्रकल्पाची साठवण क्षमता १.५ टीएमसी आहे. त्यामुळे तालुक्यातील सिंचन क्षमता व साठवण क्षमता दोन टीएमसीने वाढविण्याबाबत वेगवेगळे पर्याय सुचविण्यात आले होते.
२०१९ मध्ये राज्यात सत्तांतर झाले. योजना राबविण्याबाबत काही त्रुटी लक्षात आल्याने हा प्रकल्प राज्याने स्वखर्चाने राबविण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता.
तालुक्यात नाराजीचा सूर; पुनर्विचार करण्याची मागणी
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर नार-पार नदीजोड प्रकल्पाला गती मिळाली आहे. यासाठीचा ‘डीपीआर’देखील अंतिम टप्प्यात आला आहे; मात्र नांदगाव तालुक्याचा ‘डीपीआ’रमध्ये समावेश नसल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे तालुक्यातील सर्व स्तरातून प्रयत्न होऊनही व जिल्ह्यातील या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वपक्षीय नेते मंडळींनी नांदगावचा नार पार योजनेत समावेश होणे याबाबत नेहमी सकारात्मक भूमिका घेतली असतानाही अतितुटीच्या खोऱ्यामध्ये नांदगाव तालुक्याचे नाव अग्रस्थानी असतानाही त्याचा समावेश याबाबत पुनर्विचार करण्यात यावा अशी सर्व स्तरातून मागणी करण्यात येत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.