New Variety : नवीन सात वाणांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता

ऊस, गहू, ज्वारी, तूर, तीळ, उडदाचा समावेश
New Variety
New VarietyAgrowon


सूर्यकांत नेटके ः अॅग्रोवन वृत्तसेवा
नगर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून संशोधित ऊस, गहू, ज्वारी, तूर, तीळ, उडदाच्या एकूण सात वाणांना भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रीय पीक वाण प्रसारण उपसमितीच्या बैठकीत राष्ट्रीय स्तरावर मान्यता देण्यात आली. उत्पादन वाढीसाठी या वैशिष्ट्यपूर्ण वाणांची शेतकऱ्यांना पेरणी करता येणार आहे.

New Variety
PDKV Crop Verity : ‘पंदेकृवि’च्या तीन वाणांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, संशोधन संचालक व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राचे ऊस विशेषज्ञ डॉ. भरत रासकर, डॉ. रामदास गारकर, गहू विशेषज्ञ डॉ. सुरेश दोडके, ज्वारी सुधार प्रकल्पाचे वरिष्ठ ज्वारी पैदासकार डॉ. दीपक दुधाडे, कडधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुटे व जळगाव येथील तेलबिया संशोधन केंद्राचे डॉ. संजीव पाटील, डॉ. सुमेरसिंग राजपूत आदींच्या पुढाकारातून विद्यापीठाने संशोधित केलेल्या ऊस, गहू, ज्वारी, तूर, तीळ, उडदाच्या एकूण सात वाणांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली.
-------

New Variety
Cotton नवीन वाणास ICAR ची मान्यता| ॲग्रोवन

वाणांची वैशिष्ट्ये अशी...
ऊस (फुले ११०८२) ः लवकर पक्व होणारा वाण असून उत्पादनात १५.४० टक्के, साखर उत्पादन १३.५२ टक्के, हा वाण ‘तुल्यवाण कोसी ६७१’ पेक्षा सरस आढळून आला आहे. वाढीचा वेग जास्त असून फुटव्यांची संख्या मर्यादित आहे. वाढ्यावर कुस नाही. या वाणाची मुळे जमिनीत खोलवर जात असून मुळांचा पसारा अधिक असल्याने पाण्याचा ताण सहन करतो. ऊस लोळण्याचे प्रमाण नगन्य आहे. हा वाण चाबूक काणी व पाने पिवळी पडणाऱ्या रोगास प्रतिकारक आहे. मर आणि लालकुज या रोगांना मध्यम प्रतिकारक आहे. खोडकीड, कांडीकीड आणि शेंडेकिडीस कमी प्रमाणात बळी पडतो. हा वाण महाराष्ट्रात लागवडीसाठी अधिसूचित केला आहे.

...
गहू (फुले अनुपम एन.आय.ए.डब्ल्यू. ३६२४) ः महाराष्ट्रामध्ये नियंत्रित पाण्याखाली वेळेवर पेरणीसाठी शिफारस आहे. हा वाण आकर्षक टपोरे दाणे, प्रथिनांचे प्रमाण ११.४ टक्के. तांबेरा रोगास प्रतिकारक्षम तसेच चपातीसाठी उत्तम, पक्व होण्याचा कालावधी १०५ ते ११० दिवस, उत्पादन क्षमता ३० ते ३५ क्विंटल प्रतिहेक्टर. पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता आहे.
....
- रब्बी ज्वारी (फुले यशोमती आर.एस.व्ही. १९१०) ः महाराष्ट्रातील रब्बी हंगामात वेळेवर पेरणी आणि जिरायती लागवडीसाठी प्रसारित. सरासरी उत्पादन प्रतिहेक्टरी ९.३ क्विंटल. उच्च उत्पादनक्षमता प्रतिहेक्टरी १२.०० क्विंटल. प्रचलित वाण ‘फुले अनुराधा’ व मालदांडी ‘३५-१’ पेक्षा अनुक्रमे ८ टक्के आणि १९ टक्के अधिक उत्पादन देणारा वाण. पक्वता कालावधी ११२ ते ११५ दिवस. पांढरे शुभ्र रंगाचे टपोरे दाणे. खोड माशीस प्रतिकारक व खडखड्या रोगास मध्यम प्रतिकारक आहे.
.....

- तूर (फुले तृप्ती पी.टी.१०-१) ः देशाच्या मध्य विभागातील महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड या राज्यांसाठी खरीप हंगामात वेळेवर पेरणी आणि जिराईत, बागायत लागवडीसाठी प्रसारित. सरासरी प्रतिहेक्टरी २२.६६ क्विंटल उत्पादन. उच्च उत्पादनक्षमता प्रतिहेक्टरी ३२.०० क्विंटल. प्रचलित वाण ‘फुले राजेश्‍वरी’ आणि ‘बीडीएन-७११’ या वाणांपेक्षा या वाणांना अनुक्रमे ३३.४५ टक्के आणि ४२.९७ टक्के अधिक उत्पादन. पक्वता कालावधी १६५ दिवस आहे. फिकट तपकिरी रंगाचे टपोरे दाणे असून, १०० दाण्यांचे वजन १०.८१ ग्रॅम आहे. हा वाण मर आणि वांझ रोगास मध्यम प्रतिकारक. शेंगा पोखरणारी अळी, शेंगमाशी या किडीचा कमी प्रादुर्भाव दिसून आला. तुरीचा दुसरा वाण फुले कावेरी (पी.टी.११-४) हा देशाच्या दक्षिण विभागातील तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि ओडिशा या राज्यांसाठी खरीप हंगामात वेळेवर पेरणी आणि जिराईत तसेच बागायत लागवडीसाठी प्रसारित. सरासरी प्रति हेक्टरी १५.९१ क्विंटल उत्पादन. उच्च उत्पादनक्षमता प्रतिहेक्टरी २४.०० क्विंटल. प्रचलित वाण फुले राजेश्‍वरी या वाणापेक्षा या वाणाने २२.८६ टक्के अधिक उत्पादन दिले आहे. या वाणाचा पक्वता कालावधी १६४ दिवस. फिकट तपकिरी रंगाचे अधिक टपोरे दाणे. १०० दाण्यांचे वजन ११.५२ ग्रॅम
आहे. मर आणि वांझ रोगास मध्यम प्रतिकारक. शेंगा पोखरणारी अळी आणि शेंगमाशी या किडीचा सुद्धा कमी प्रादुर्भाव दिसून आला.

.....
तीळ (जे. एल.टी. ४०८-२ (फुले पूर्णा) ः महाराष्ट्रातील खानदेश, मराठवाड्यात उन्हाळी हंगामासाठी प्रसारित. उत्पादन हेक्टरी ७०५ किलो. तेलाचे प्रमाण ४९ टक्के. पक्वता कालावधी ९५ ते १०० दिवस. १००० दाण्यांचे वजन ४ ग्रॅम. पानावरील ठिपके व पूर्णगुच्छ रोगासाठी प्रतिकारक. पाने गुंडाळणारी अळी, फळ पोखरणाऱ्या अळीसाठी सहनशील आहे.
...
उडीद (पीयू ०६०९-४३ (फुले वसू) ः महाराष्ट्रातील उडीद पिकविणाऱ्या भागासाठी प्रसारित. या वाणाची अधिकतम उत्पादनक्षमता १९ क्विं./ हे. आहे. या वाणाचा टपोरा दाणा असून, १०० दाण्यांचे वजन ४.८७ ग्रॅम आहे. हा वाण भुरी व पिवळा विषाणू या रोगास प्रतिकारक्षम आहे. याचा परिपक्वता कालावधी ७३ दिवसांचा आहे.
----------
कोट ः
महात्मा फुले कृषी विद्यापीठाची शेतकऱ्यांसाठी उन्नत वाण देण्याची परंपरा कायम आहे. या वर्षी देखील राष्ट्रीय स्तरावर सात वाणांना मान्यता देण्यात आली. याचा फायदा निश्‍चितच शेतकऱ्यांना होईल.
- डॉ. पी.जी. पाटील, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

 --

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com