
ॲग्रोवन वृत्तसेवा
नागपूर : विज्ञान व तंत्रज्ञानाचे साहाय्य व महिलांचा सहभाग घेऊन येत्या दशकात देशाला जागतिकस्तरावर उच्चस्थानी नेण्याचा निर्धार राष्ट्रीय विज्ञान परिषदेच्या (National Science Council) पहिल्या परिसंवादात (seminar) सहभागी वैज्ञानिकांनी व्यक्त केला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजित १०८ व्या राष्ट्रीय विज्ञान परिषदेत ‘विज्ञान व तंत्रज्ञान आव्हाने व संधी’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.
देशाचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजय सुद, केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन, केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. अलका शर्मा, ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. चंद्रशेखर आणि डॉ. कलायशेल्वी यांनी त्यात सहभाग घेतला.
प्रा. सुद म्हणाले, की देशाने जागतिक संशोधन निर्देशांकात ८१ व्या स्थानावरून ४० वे स्थान मिळविले आहे. देशाला संशोधन क्षेत्रात आघाडीवर नेण्यासाठी महिलांचा सहभाग आवश्यक आहे.
स्टार्टअप क्षेत्रात महिलांचा सहभाग आणि विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करून २०२५ पर्यंतचे उद्दिष्ट ठेवून प्रगती साधण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. एम. रविचंद्रन यांनी समुद्र संपत्ती आधारित अर्थव्यवस्था अर्थात ब्लू इकॉनॉमी विषयातील संधी व आव्हाने यावर प्रकाश टाकला.
एकूण भूभागाच्या ७२ टक्के भाग व्यापणाऱ्या जलसंपत्तीचा केवळ ५ टक्केच उपयोग होतो. या क्षेत्रातील बलस्थानांचा पुरेपूर वापर होण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञानावर भर द्यावा लागेल. युनो संघटनेने जागतिकस्तरावर २०३० पर्यंत समुद्र संपत्तीचा अधिकाधिक उपयोग करण्याचे ध्येय ठेवले आहे.
भारतानेही या दिशेने पाऊले टाकण्यास सुरुवात केली असून, समुद्री संपत्तीचा वापर करताना पर्यावरणाला हानी होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
डॉ. अलका शर्मा म्हणाल्या, की जैवइंधनाचा वापर वाढविण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागेल. कार्बन आधारित इंधनावर चालणाऱ्या वाहनांची आयात थांबवण्यासाठी ऊर्जा व जैवतंत्रज्ञाधारित इंधनाचा वापर व्हावा.
विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात महिलांच्या सहभागासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याची निकडही त्यांनी मांडली. डॉ. चंद्रशेखर यांनी सांगितले, की शाश्वत विकासाची संकल्पना व्यापक असून, त्यासाठी संशोधन कार्य ग्रामीण भागापासून जागतिकस्तरावर पोहोचवावे लागेल.
कृषी क्षेत्रात विज्ञानाचा उपयोग होऊन शेतकऱ्यांना रास्तदरात गुणात्मक शेती निविष्ठा उपलब्धतेसाठी प्रयत्न व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
डॉ. कलायशेल्वी म्हणाल्या, की विज्ञान -तंत्रज्ञानाला संशोधन शिक्षक-विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या साह्याने प्रगती साधण्यासाठी महिलांच्या सहभागासह राबवावयाच्या सप्तसूत्रीची मांडणी त्यांनी केली.
प्रा. अजय सूद यांना आशुतोष मुखर्जी पुरस्कार
या परिसंवादाच्या समारोपानंतर देशाचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजय सूद यांना आशुतोष मुखर्जी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राष्ट्रीय विज्ञान परिषदेच्या अध्यक्ष विजयलक्ष्मी सक्सेना यांच्या हस्ते विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.