राष्ट्रवादीकडून खडसे, निंबाळकर, गर्जेंना संधी

भाजपच्या पाठिंब्यावर खोतांचा अपक्ष अर्ज; विधानपरिषद निवडणूक
राष्ट्रवादीकडून खडसे, निंबाळकर, गर्जेंना संधी
ElectionAgrowon

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत (Rajysabha Election) जोरदार रस्सीखेच सुरू असतानाच विधानपरिषदेच्या (MLC Election) निवडणुकीत भाजपने सहाव्या जागेवर माजी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना, तर राष्ट्रवादी काँग्रेसने रामराजे नाईक - निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar), एकनाथ खडसे (Eknath Khadase) आणि शिवाजीराव गर्जे (Shiwajirao Garje) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने बुधवारी पाच उमेदवार जाहीर केल्यानंतर गुरुवारी (ता.९) सकाळी खोत यांचा अर्ज दाखल केला.

विधानपरिषदेसाठी सर्वच पक्षांनी आपले उमेदवार जाहीर करून अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी सकाळी उमेदवारांची यादी जाहीर केली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या उमेदवारांची घोषणा केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात आले. अर्जमाघारीच्या अंतिम मुदतीनंतरच लढतीबाबत चित्र स्पष्ट होईल.

भाजपने पहिल्या पाच उमेदवारांच्या यादीत खोत यांच्यासह विनायक मेटे यांना उमेदवारी नाकारली होती. मात्र, अनेक घडामोडींनंतर सहाव्या जागेवर खोत यांचा अर्ज दाखल करण्यात आला. खोत यांना भाजपने पाठिंबा दिला असून अपक्ष अर्ज दाखल करण्यात आला आहे.

मलिक, देशमुखांचा मतदानाचा अधिकार नाकारला

मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली कारागृहात असलेल्या अनिल देशमुख आणि नवाब मलिक या राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांना राज्यसभा निवडणुकीत मतदानाचा अधिकार बजावता यावा, या साठी ईडी कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जावर गुरुवारी सुनावणी झाल्यानंतर अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. आज (ता.१०) दुपारी १२ वाजता या अर्जावर सुनावणी होईल.

‘भाजप घोडेबाजार करण्याच्या मनःस्थितीत’

एकनाथ खडसे यांच्या नावाला राष्ट्रवादी काँग्रेसमधून विरोध असल्याच्या अफवा आहेत, असा खुलासा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. ‘‘पक्षात कुणाच्याही नावाला विरोध नव्हता. एकमताने हा निर्णय पक्षाने घेतला आहे. सरकार पाडण्याचे भाजपचे सर्व प्रयत्न फसले आहेत. त्यामुळे सध्या घोडेबाजार करायच्या मनःस्थितीत ते आहेत. तोच प्रयत्न राज्यसभा निवडणुकीत चालला आहे. सुदैवाने राज्यसभेच्या निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत आमदारांना आपले मत दाखवण्याची तरतूद आहे. परंतु अपक्षांना नाही, त्यामुळे ते सर्व अपक्षांच्या मागे लागले आहेत,’’ असे पाटील म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com