
कोल्हापूर ः रासायनिक शेतीचे (Chemical Farming)अनेक दुष्परिणाम दिसू लागले आहेत. माणसाच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. त्यामुळेच विषमुक्त (Poison Free Agriculture) व शाश्वत विकासासाठी नैसर्गिक शेती (Natural Farming) करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी (Kadsidhheshwar Swami) यांनी केले.
प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, अर्थात रामेती येथे झालेल्या नैसर्गिक शेती जाणीव जागृती कार्यक्रमात ते बोलत होते. कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्या निर्देशानुसार राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्थान, वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, (वनमती) नागपूर व रामेती, कसबा बावडा यांच्यातर्फे सरपंचांसाठी नैसर्गिक शेती जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
काडसिद्धेश्वर स्वामी म्हणाले, की एकूण जागतिक अन्नधान्य उत्पादनाच्या ९५ टक्के उत्पादन मातीतून होत असल्याने, मातीची सुपिकता टिकवून ठेवणे आवश्यक आहे. जमिनीतील उपयुक्त जिवाणू जिवंत राहिले तरच सजीवसृष्टी व मानवजात जिवंत राहणार असून, सर्व घटकांनी यासाठी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे.
दैनंदिन जीवनात सकस व विषमुक्त अन्नाची गरज नमूद करून, नैसर्गिक शेतीचे महत्त्व अधोरेखित करताना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सेंद्रिय भाजीपाला उत्पादनाकरिता विशेष कार्यक्रम मंजूर केल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्हाण यांनी सांगितले.
विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार यांनी प्रत्यक्ष व ऑनलाइन पद्धतीने उपस्थित असलेल्या संरपचांनी कार्यक्षेत्रात नैसर्गिक शेती पद्धतीस सामूहिक पद्धतीने चालना देण्याचे आवाहन केले. तर नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून जमिनीची सुपीकता व कार्बन क्रेडिट याचे महत्त्व विषद करून कोल्हापूर जिल्ह्याने सेंद्रिय उत्पादनात नावीन्यपूर्ण ओळख निर्माण करावी, असे आवाहन रामेतीचे प्राचार्य उमेश पाटील यांनी केले.
कार्यक्रमास १० उपविभागातील सरपंच व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नामदेव परीट यांनी आभार मानले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.