
Pune News : ‘‘पाझरपड जमिनी पुन्हा लागवडीखाली आणायच्या असतील जुन्या काळातील ओढे, नाले, डोह, पाणथळ आदींचे पुनरुज्जीवन झाले पाहिजे. ते नाहीसे झाल्याने पाझरपडीचे क्षेत्र वाढत आहे. जिथे पाणी नाही तेथे पाणी अडविले पाहिजे तर जिथे जास्त पाणी आहे तिथे पाणी काढून दिले पाहिजे,’’ असे मत जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केले.
पारगाव (ता. दौंड) येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वसुधा सरदार यांच्या नवनिर्माण न्यास संस्थेत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. दौंड व शिरूर तालुक्यांतील पाझरपड जमिनींची पाहणी करण्यासाठी ते आले होते. या समस्येवरील कारणे व उपाय यावर या वेळी चर्चा झाली. पर्जन्यमानानुसार पीक पद्धती बदलली पाहिजेत यावरही चर्चासत्रात भर देण्यात आला.
या वेळी ‘यशदा’चे संचालक हरिहर कौसडीकर, यशदाचे निवृत्त अधिकारी सुमंत पांडे, दौंडचे गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, शिरूरचे गटविकास अधिकारी अजित देसाई, वसुधा सरदार, सरपंच जयश्री ताकवणे, डॅा. यशवंत खताळ, तुकाराम ताकवणे, मच्छिंद्र ताकवणे, कैलास ताकवणे, ‘आत्मा’चे कृषी अधिकारी महेश रूपनवर, सदाशिव रणदिवे, मानवलोक संस्थेचे अधिकारी आदी उपस्थित होते.
सिंह म्हणाले, की उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांनी जमीन व पाणी स्रोतांची रचना बदलून टाकली आहे. त्याचे दुष्परिणाम शेतकरी भोगत आहे. तसेच शेतकऱ्यांनी ओढे, नाले, डोह सपाट करून टाकले आहेत.
हे सर्व बदलायचे असेल तर लोकसहभागातून जैवविविधतेवर भर दिला पाहिजे. शेतात हिरवळीचे पिके घेतली पाहिजेत. पिकांना मोठ्या प्रमाणात रासायनिक खते वापरणार असू तर नद्या प्रदूषित होतील. त्यासाठी सेंद्रिय शेतीचा विचार शेतकऱ्यांनी करावा.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.