
औरंगाबाद : कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान (Agriculture Technology) शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत व्यवस्थित पोहोचायला हवे. एकीकडे उत्पादकता (Agriculture Productivity) वाढ झाली असताना शेती का परवडत नाही याचा विचार करण्याची गरज आहे. प्रत्येक पिकाच्या वाणासोबत व्यवस्थापनाकडे (Crop Management) व उत्पादित मालाच्या मूल्यवर्धनाकडे (Value Addition) शेतकऱ्यांनी लक्ष द्यायला हवे. शेतकरी ज्ञानवान होण्यासाठी विद्यापीठाचे प्रयत्न सुरू आहेत, असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डी. एल. गोखले यांनी व्यक्त केले.
जिल्ह्यातील शंकरपूर (ता. गंगापूर) येथे अभंग शेवाळे यांच्या शेतात आयोजित शेती दिन कार्यक्रमातून तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना तूर व मोसंबी पिकाच्या व्यवस्थापनाचे धडे दिले. या वेळी गोखले बोलत होते. या शेती दिन कार्यक्रमाला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डी. एल. गोखले, बदनापूरच्या कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. डी. के. पाटील, विभागीय कृषी सहसंचालक डॉ. डी. एल. जाधव, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. एस. बी. पवार, हिमायतबाग फळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. एम. बी. पाटील, संचालक विस्तार डॉ. तुकाराम मोटे, अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाडगे, डॉ. एन. आर. पतंगे, डॉ. संजूला भावर, इफ्कोचे सुनील कुलकर्णी गंगापूरचे तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारगे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामेश्वर ठोंबरे यांनी केले.
डॉ. डी. के. पाटील म्हणाले, बीडीएन ७११ व गोदावरी आदी तुरीच्या वाणांनी शेतकऱ्यांचे लक्ष केंद्रित केले आहे. लवकर येणार सुधारित तसेच जमिनीच्या मगदूराप्रमाणे वाणांचा वापर शेतकऱ्यांनी करावा. जास्त दिवसाची वाण उत्पादनक्षम आहेत. त्यामुळे वानाचे गुण लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी त्याची लागवड करावी. तुरीमध्ये यंदा फाइटोपथोराचा त्रास वाढला आहे. तुरीचे पीक घेताना फेरपालट महत्त्वाची. तुरीचे पीक बहू वार्षिक असल्याने शेंगा आल्यावर त्याला पाणी देऊ नये. कळी लागण्या आधी निंबोळी अर्काचा वापर केल्याने, ५० टक्के कीड नियंत्रण होते. डॉ. पतंगे यांनी तुरीवर येणाऱ्या किडी व त्यांच्या नियंत्रणाची माहिती दिली.
डॉ. पवार म्हणाले, तूर पिकाला उसाचे पर्यायी मार्ग पाहावे. आंतरपीक पद्धतीमुळे पिकाची जोखीम कमी होते. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी ज्वारी, बाजरी आदी पिकांकडे लक्ष केंद्रित करावे. डॉ. पाटील म्हणाले, मोसंबीमध्ये वर्षभर कोळी पिकांचा प्रादुर्भाव आढळून येतो. कीड नियंत्रणासाठी भारी औषधाच्या वापरामुळे कोळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात येण्याऐवजी वाढतो आहे.
योग्य वेळीच मोसंबीचा ताण तोडायला हवा. मोसंबीत ग्रीनिंगचा प्रादुर्भाव वाढला आहे. दोन बहार घेणे योग्यच नाही. बहार दोन व खत एका बहाराचे हे योग्य नसून सेंद्रिय खताच्या अंतर्भावासोबतच सूक्ष्म अन्नद्रव्याचे महत्त्वही शेतकऱ्यांनी समजून घ्यायला हवे. कॉलर रॉटचा प्रादुर्भाव दिसून आलेल्या शेतकऱ्यांनी झाडांना खोडाजवळ पाणी देऊ नये. समारोपीय भाषणात विभागीय कृषी सहसंचालक डॉ. जाधव यांनी शासनाची तसेच कृषी विभागाची भूमिका शेतीवरील संकट व त्यावर मात करण्यासाठी कोणत्या गोष्टींचा विचार करायला हवा. याविषयी मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारगे यांनी आभार मानले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.