
Agriculture Marketing औरंगाबाद : कृषी विभागाच्या रोजगार हमी योजनेतून (Employment Guarantee Scheme) साकारलेल्या फळबागा (Horticulture) हा इतर राज्यांसाठी सुद्धा अनुकरणीय उपक्रम होता.
आपण आता उत्पादनात शिखर गाठले आहे. प्रक्रिया (Food Processing) व विपणन (Agriculture Marketing) याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मत विभागीय कृषी सहसंचालक डॉ. दिनकरराव जाधव यांनी व्यक्त केले.
सहकार व पणन विभाग, महाराष्ट्र शासन आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र ॲग्री बिझिनेस नेटवर्क प्रकल्प (मॅग्नेट), ग्रँड थोर्नटन व आकाश ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी, सिल्लोड यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके), बदनापूर येथे एक दिवसीय प्रशिक्षणाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील सीएमआरसी महिला गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सुमारे दोनशे मोसंबी उत्पादकांनी यात सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ. जाधव बोलत होते. ‘मॅग्नेट’चे विभागीय प्रकल्प उपसंचालक जी. सी. वाघ प्रास्ताविकात म्हणाले, की फळांना स्वच्छ्ता, वर्गवारी करणे, वॅक्स कोटिंग करणे, पॅकिंग, ब्रँडिंग, ट्रान्सपोर्ट व मार्केटिंग करणे या सर्व सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध करण्यासाठी ‘मॅग्नेट’ प्रकल्पांतर्गत निधी उपलब्ध होणार आहे.
डॉ. जाधव म्हणाले, की मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी छोट्या प्रमाणात उद्योग सुरू करावेत. मोसंबी फळांना ग्रेडिंग करून चांगले पॅकिंग करून पुणे, मुंबई व दिल्ली या सारख्या मोठ्या बाजारपेठेत विक्री केल्यास अधिक नफा मिळू शकतो.
प्रकल्प संचालक ‘आत्मा’ शीतल चव्हाण यांनी मोसंबी फळांपासून तसेच साल व पानांपासून मिळणारे विविध औषधीय पदार्थ तसेच परफ्यूम यांचे बाजारमूल्य विशद करून व्यापारी दृष्टिने उत्पादन करण्याची आवश्यकता व्यक्त केली.
फळ संशोधन केंद्र, औरंगाबादचे प्रभारी अधिकारी डॉ. एम. बी. पाटील यांनी मोसंबी उत्पादनातील चांगल्या पद्धती विशेषत: सध्याच्या फळ गळ या समस्येवर मार्गदर्शन केले.
कृषी विज्ञान केंद्र, खरपुडीचे उद्यान विद्या विशेषज्ञ डॉ. शशिकांत पाटील यांनी मोसंबी फळाला प्रक्रिया करण्यासाठी तसेच दीर्घकाळ साठवणूक करण्यासाठी असलेल्या संधीविषयी मार्गदर्शन केले.
समीर अंबेकर यांनी ग्लोबल गॅप प्रमाणिकरणाचे महत्त्व, त्याचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील फायदे व प्रमाणिकरणाची प्रक्रिया याविषयी माहिती सांगितली. विविध बाबींसाठी आकाश ॲग्रो एंकर एफपीसी म्हणून सहकार्य करण्यास नेहमीच तत्पर राहील, असे सिल्लोड येथील आकाशचंद्र गौर यांनी सांगितले.
केव्हीके बदनापूरचे प्रभारी अधिकारी डॉ. सचिन सोमवंशी व डॉ. साधना उमरीकर यांनी प्रशिक्षणाच्या नियोजनात मोलाचे योगदान दिले. ‘मॅग्नेट’ प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अरुण नादरे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन आकाश ॲग्रोचे डॉ. राजीव पाटील यांनी केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.