
Sharad Pawar News सांगली ः राज्यात सहकार (Cooperative Sector) टिकवायचा असेल तर, वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, गुलाबराव पाटील यांनी ज्या पद्धतीने काम केले, त्याच मार्गाचा अवलंब करावा लागेल.
अन्यथा सहकारातील खासगीकरणाला (Cooperative Privatization) आवर घातला येणार नाही, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केले.
सांगली येथे सोमवारी (ता. २०) सहकारतीर्थ गुलाबराव पाटील जन्मशताब्दी वर्ष सांगता सोहळ्यात ते बोलत होते. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील अध्यक्षस्थानी होते.
या वेळी पालकमंत्री सुरेश खाडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार संजय पाटील, आमदार मोहनराव कदम, आमदार अरुण लाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विश्वजित कदम, विक्रम सावंत, सुमन पाटील, जिल्हा बँक उपाध्यक्ष जयश्री पाटील, विशाल पाटील, जयंत आसगावकर यांच्यासह महापौर दिग्विजय सूर्यवंशी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, की वसंतदादा पाटील, राजारामबापू, वि. स. पागे यांनी समाजाला वेगळी दृष्टी देण्याचे काम केले. सहकार वाढवण्यासाठी गुलाबराव पाटील यांचे मोलाचे योगदान आहे.
त्यांच्यामुळेच राज्यातील सहकार चळवळ शक्तिशाली बनली. चळवळीत अनेक लोक असतात. वाद-विवाद होतात. पण गुलाबराव पाटील यांनी आयुष्यात स्वच्छ कपड्यावर एकही डाग पडू दिला नाही.
ते म्हणाले, की राज्य सहकार बॅंक आशिया खंडातील सर्वांत मोठी आहे; मात्र, सहकाराला पूर्वीसारखे दिवस आहेत की, नाहीत हे सांगणे कठीण आहे. सध्याच्या काळात सहकारी संस्था कमी होत असून खासगी संस्था वाढत आहेत. अर्थकारण समाजाच्या व्यापक हिसासाठी व्हावे.
एच. के. पाटील म्हणाले, की केंद्र, राज्य सरकारचे धोरण सहकाराला हितकारक नाही. गेल्या काही काळात दीड लाख कोटी रुपये सहकार क्षेत्राचा निधी कमी करून इतरत्र वळवला. आता हीच वेळ आहे, विरोधाचा आवाज वाढवण्याची. सहकार बुडवावा अशीच केंद्र, राज्य सरकारची भावना आहे.
या वेळी खासदार श्रीनिवास पाटील, खासदार संजय पाटील, आमदार जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांनी मनोगत व्यक्त केले.
या वेळी गुलाबराव पाटील शिक्षण संकुलाचे संस्थापक, काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी आभार मानले.
सुशीलकुमार शिंदे, अनास्कर यांना पुरस्कार
माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांना सहकारतीर्थ गुलाबराव पाटील पुरस्कार व माजी आमदार शरद पाटील, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ घोडके यांना सहकारतीर्थ गुलाबराव पाटील ऋणानुबंध पुरस्कार या वेळी प्रदान करण्यात आला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.