
Nashik Agriculture News : ‘राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठान’ (एनएचआरडीएफ) या संस्थेने लाल कांद्याची मागणी ओळखून उन्हाळ कांद्याप्रमाणेच टिकवणक्षमता व उत्पादकता असलेला आकर्षक लाल रंगाचा ‘एनएचआरडीएफ-फुरसुंगी’ हा नवीन वाण संस्थेने विकसित केला आहे.
याची लेट खरीप, रब्बी हंगामात लागवडीसाठी शिफारस आहे. येत्या सप्टेंबरपासून या वाणाचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होईल,’’ अशी माहिती केंद्राचे संचालक डॉ. पी. के. गुप्ता यांनी दिली.
‘एनएचआरडीएफ’ने खरीप, लेट खरीप आणि रब्बी हंगामासाठी कांद्याचे विविध वाण विकसित केले आहेत. देशभरात विविध संस्थांनी विकसित केलेले कांद्याचे ७७ वाण आहेत. त्यापैकी संस्थेने आतापर्यंत कांद्याचे १४ वाण विकसित केले आहेत.
‘‘केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे २०१७ मध्ये हा वाण अधिसूचित झाला. २०१९ मध्ये ‘एनएचआरडीएफ-फुरसुंगी’ या वाणाची अधिसूचना प्रकाशित झाली. त्यानंतर मूलभूत, पैदासकार बियाण्यांचे गुणन करून गेल्या तीन वर्षांत बीजोत्पादन कार्यक्रम हाती घेतला होता.
त्यानुसार या वर्षी नव्या विकसित वाणाचे बियाणे प्रमाणित आणि सत्यप्रत या प्रकारात उपलब्ध होईल. येत्या सप्टेंबरपासून याचे बियाणे संस्थेच्या विविध केंद्रांवर मिळेल.
मात्र सध्या या बियाण्याचे दर निश्चित नसल्याने ते पुढील टप्प्यात कळविण्यात येतील,’’ असे डॉ. गुप्ता यांनी सांगितले.
हा वाण विकसित करण्यासाठी डॉ. गुप्ता यांच्यासह डॉ. आर. के. सिंग, वरिष्ठ तंत्र अधिकारी तुषार आंबरे, तांत्रिक सहायक बी. पी. रायते यांनी योगदान दिले.
वाणाच्या देशभर चाचण्या
‘एनएचआरडीएफ’च्या देशभरातील १८ केंद्रांवर ‘एनएचआरडीएफ-फुरसुंगी’ वाणाची प्रात्यक्षिक लागवड केली होती. त्यानंतर प्रमाणीकरण करण्यात आले. प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश यांसह उत्तर भारतातील राज्यांमध्ये याचे यशस्वी उत्पादन मिळाले.
देशभरातील संशोधन केंद्रांवरसुद्धा लागवड आणि उत्पादनासंबंधी सकारात्मक परिणाम समोर आले. चितेगाव (ता. निफाड, जि. नाशिक) येथील संशोधन केंद्रावर या वाणाची लागवड करण्यात आली होती.
वाणाची वैशिष्ट्ये :
- पुनर्लागवडपश्चात ११० ते १२० दिवसांत काढणीस योग्य
- आकर्षक व लाल रंगाचा गोलाकार कांदा. ५.८० ते ६.२५ सेंमी व्यास
- प्रतिहेक्टरी ३८० ते ४०० क्विंटल उत्पादकता
- घन पदार्थ प्रमाण १३ ते १४ टक्के
- काढणीपश्चात ५ ते ६ महिने साठवणूक क्षमता
- इतर वाणांच्या तुलनेत चांगली साठवणूक क्षमता
- करपा, बुरशीजन्य रोगांना इतर वाणाच्या तुलनेत सहनशील
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.