
अमळनेर, जि. जळगाव : अमळनेर मतदार संघात २०१९ मध्ये अतिवृष्टी, तसेच २०२१ ला गुलाबी वादळ (Pink Cyclone) व अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) असंख्य शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामेही (Crop Damage Survey) झाले. मागील शासनाने मंजुरी देऊनही राज्य शासन शेतकऱ्यांना पैसे देत नसल्याने ते त्वरित द्यावेत, अशी मागणी आमदार अनिल पाटील (MLA Anil Patil) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्याकडे केली.
पाटील यांच्यासह आमदारांच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे राज्याच्या विविध प्रश्नांबाबत राज्यपालांची नुकतीच भेट घेतली. या वेळी पाटील यांनी अमळनेर मतदारसंघातील विविध प्रश्न मांडले. यात प्रामुख्याने पीडित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे मिळत नसल्याने त्यावर राज्यपालांचे लक्ष केंद्रित केले.
पाटील म्हणाले, ‘‘अमळनेर मतदार संघात सप्टेंबर २०१९ मध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर २०२१ मध्ये गुलाबी वादळ आणि अतिवृष्टीमुळे अमळनेर तालुक्यातील ८ मंडले आणि अमळनेर विधानसभा मतदार संघात येणाऱ्या पारोळा तालुक्यातील २ मंडलांच्या परिसरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दोन्ही वेळा या नुकसानीचे पंचनामे होऊन अहवाल शासनाला सादर झाला.’’
तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी या दोन्ही प्रस्तावांना मान्यताही दिली. मात्र या शासनाने मागील सरकारच्या धोरणांना स्थगिती देण्याचा सपाटा लावल्याने अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांचा अनुदानाचा मदत देण्याचा विषय स्थगित करून शेतकऱ्यांचे पैसे रोखून धरले आहेत. तरी आधीच पीडित असलेल्या शेतकऱ्यांना ते पैसे तातडीने अदा करावेत, अशी आग्रही मागणी पाटील यांनी केली.
भरपाईच्या मागणीवर राज्यपालांनी सकारात्मकता दर्शविली. तसेच विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकरी व नागरिकांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत व दिलासा मिळावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांनी करत राज्याच्या विविध मागण्यांबाबतचे निवेदन राज्यपालांना सादर केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.