
Solapur News : सुरत-चेन्नई हा ग्रीन फिल्ड महामार्ग अक्कलकोटसह दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, बार्शी या चार तालुक्यांतून जात आहे. जिल्हा प्रशासनाने यासाठी संपादित करावयाच्या जमिनीसाठी (Land Acquisition) शेती दराच्या नोटिसा देण्यास सुरुवात केली आहे.
मात्र त्यामध्ये अगदी तुटपुंजा दर (Land Acquisition Compensation) नमूद केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या प्रश्नावर बार्शीपाठोपाठ आता अक्कलकोट तालुक्यातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आता सत्ताधारी भाजपसह विरोधी काँग्रेसच्या नेत्यांनीही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.
अक्कलकोटचे माजी नगरसेवक महेश हिंडोळे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेतकऱ्यांनी नुकतीच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेतली. तसेच यात होत असलेल्या अन्यायाची माहिती दिली.
या वेळी सुरेखा होळीकट्टी, डॉ. गुलापल्ली, नानू कोरबू, सोमलिंग निंबाळ, चेतन जाधव, सिद्धाराम कोरे, शांतप्पा हौदे, भीमण्णा माळी, वाहिद नाईकवाडी, सुनील दसले, लक्ष्मीपुत्र तेलुनगी, जग्गनाथ कलमनी आदी उपस्थित होते.
हिंडोळे म्हणाले, ‘‘अक्कलकोट तालुक्यामध्ये जमिनीचे एकरी भाव किमान दहा ते पंधरा लाखांच्या वर आहेत. असे असताना तीन ते पाच लाख रुपये दर मिळणे, ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. नुकतेच एका कांदा उत्पादकाला ५०० किलो कांदा विकून दोन रुपये पट्टी मिळाली.
तशी थट्टा तर सरकार शेतकऱ्यांची करत नाही ना, असा प्रश्न उपस्थित करीत शेतकऱ्याला किमान १५ लाख रुपये एकरी दर मिळावा, अन्यथा तीव्र आंदोलन उभे करू.’’ बार्शी आणि उत्तर सोलापुरातूनही शेतकऱ्यांनी या आधीच तक्रारी केल्या आहेत.
नियमानुसारच मोबदला
केंद्र शासनाने मोबदला देण्यासाठी भूसंपादन कायद्यात जी तरतूद केली आहे. त्यानुसारच शेतकऱ्यांना मोबदला दिला जात आहे. संबंधित गावातील मागील तीन वर्षांतील जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारांचा विचार करून दर दिला जात आहे.
पण लवकरच शेतकऱ्यांच्या स्वतंत्र बैठका घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून योग्य निर्णय घेऊ, असे आश्वासन शेतकऱ्यांच्या या शिष्टमंडळाला जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिल्याचे सांगण्यात आले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.