‘पौष्टिक भरडधान्ये’ वाढीसाठी सरसावले असंख्य हात

देशभर स्वीकारली जातेय ‘भरपूर पोषणमूल्य’ ही भूमिका
Millets
MilletsAgrowon

पुणे - ‘पोटभर अन्न’ या जुन्या संकल्पनेऐवजी ‘भरपूर पोषणमूल्य’ असलेले अन्न हवे, अशी नवी भूमिका देशभर स्वीकारली जात आहे. त्यामुळे पौष्टिक तृणधान्य पिकांखालील (Area Under Millet's) (भरडधान्ये) घटते क्षेत्र पुन्हा वाढविण्यासाठी शास्त्रत्र, धोरणकर्ते, कृषी खात्यातील अधिकारी आणि कष्टकरी शेतकऱ्यांचे हात पुन्हा प्रयत्नाची शर्थ करीत आहेत.

आगामी २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरडधान्ये वर्ष’ (International Millet's Year) म्हणून साजरे करण्याची घोषणा संयुक्त राष्ट्रसंघाने (United Nations) केली आहे. त्यासाठी राष्ट्रसंघात भारताने विशेष प्रयत्न केले होते. भूक, चांगले आरोग्य व राहणीमान, शाश्वत वापर आणि उत्पादन, हवामान बदलास अनुकूलता अशा सहा बाबींसाठी पौष्टिक तृणधान्ये उपयुक्त ठरतात. विशेष म्हणजे आफ्रिका, आशियातील किमान ९० कोटी जनतेच्या आहारातील मुख्य घटक हीच तृणधान्ये आहेत.

Millets
भरडधान्ये निर्यातीला बळकटी

जगातील ४१ टक्के पौष्टिक तृणधान्यांचे उत्पादन भारतात होते. उत्पादनासाठी भातापेक्षाही (Rcie) ७० टक्के कमी पाणी, काढणीसाठी गव्हापेक्षाही अर्धा कालावधी, प्रक्रियेसाठी ४० टक्के कमी ऊर्जा हीदेखील पौष्टिक तृणधान्यांची जमेची बाजू आहे.

कमी ग्लायसेमिक इंडेक्स, भरपूर ऊर्जा, कर्बोदके, स्निग्धांश, प्रथिने, तंतुमय पदार्थ, अँटीऑक्सिडंट्स, लोह, जीवनसत्वे अशा घटकांचा पुरवठा ठरणारी भरडधान्ये ही भारताच्या आहारसंस्कृतीची मुख्य गरज असल्याचे आता समजले जाऊ लागले आहे. त्यामुळेच दुर्लक्षित बाजरीने आता लक्ष वेधले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानात आता पौष्टिक अन्नधान्यांसाठी एक उपअभियान सुरू करण्यात आले आहे. त्यातून देशातील ९ राज्यांमधील ८९ जिल्ह्यांमध्ये बाजरी पिकाला प्रोत्साहन दिले जात आहे. विशेष म्हणजे अगदी जम्मू, काश्मीर, लडाख भागातदेखील पौष्टिक तृणधान्ये उत्पादन कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.

राज्याचे कृषी संचालक विकास पाटील (विस्तार व प्रशिक्षण) यांनी सांगितले की, राज्यात पौष्टिक तृणधान्ये पिकांखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले आहे. कमी उत्पादकता, कमी भाव, आहारात कमी वापर अशी विविध कारणे त्यामागे आहेत. अर्थात, हीच स्थिती गेल्या दोन दशकांपर्यंत देशभर होती.

भरडधान्यांचे उत्पादन व उत्पादकता वाढीसाठी आता सरकारी योजनांचा वापर केला जात आहेच; पण याशिवाय त्यांची बाजारपेठ विस्तारण्यासाठीही सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ग्राहकांमध्ये या धान्यांचा वापर वाढविण्यासाठी जागृती यावी, या साठी सरकारी अर्थसाहाय्य दिले जात आहे.

सोलापुरात ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ असणार

“भारताने २०१८ मध्ये भरडधान्ये वर्ष साजरे केले होते. या धान्यांकडे इतर देशांपेक्षाही भारताने लवकर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळेच या पिकांखाली २०१५ मध्ये असलेले एकूण १४.५२ लाख टनाचे उत्पादन वाढून २०२१ मध्ये १७.९६ लाख टनावर आले आहे. यात बाजरीचा वाटा १०.८६ लाख टनाचा आहे. देशात आता या पिकांवर प्रोत्साहन देण्यासाठी तीन ठिकाणी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन केली जात आहेत. यातील एक सोलापूरमध्ये असेल,” अशी माहिती कृषी विद्यापीठाच्या सूत्रांनी दिली.

उत्पादन, उत्पादकता घटली -

पौष्टिक तृणधान्यांत राज्यात कधीकाळी ज्वारी, बाजरीचा वाटा मोठा होता. २०१०-११ मधील खरीप ज्वारीचे दहा लाख हेक्टरचे क्षेत्र आता फक्त दोन लाख हेक्‍टरवर आले आहे. रब्बी ज्वारी क्षेत्र देखील ३० लाख हेक्टरवरून १३ लाख हेक्‍टरपर्यंत आले आहे. तर बाजरीचे दहा लाखांवरून पाच लाख हेक्टरवर, तर नाचणीचे सव्वा लाख हेक्टरवरून ७५ हजार हेक्टरपर्यंत घटले आहे. मुख्य पिकांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे उत्पादकताही घटली आहे. ज्वारी, बाजरीप्रमाणेच नाचणी, वरई, राळा, कोडो या पिकांखालील क्षेत्रही घटले आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीत या पिकांचा समावेश नसणे, रोजच्या आहारातील वापर घटणे, फळबागांना प्रोत्साहन, कमी बाजारभाव यामुळे राज्यात पौष्टिक तृणधान्यांखालील क्षेत्र कमी झाले, असे कृषी खात्याचे म्हणणे आहे.

भात, गहू, कडधान्ये आणि तेलबिया पिकांकडे वर्षानुवर्षे लक्ष दिले गेले. त्यामुळे पौष्टिक तृणधान्ये पिकांखालील क्षेत्र कमी होत गेले. मात्र, आता स्थिती झपाट्याने बदलते आहे. केंद्र व राज्य शासनाच्या धोरणात्मक योजना व उद्दिष्टांमध्ये पौष्टिक तृणधान्यांना सतत महत्त्व दिले जात आहे.
- विकास पाटील, कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com