
पुणे ः राज्यात पौष्टिक तृणधान्य वर्ष (Millet Year) साजरे करण्यासाठी ‘मिलेट ऑफ मंथ’ (Millet Of The Month) ही संकल्पना प्रत्येक जिल्ह्यात राबविली जाणार आहे. विशेष म्हणजे या उपक्रमांकरिता कृषीसह इतर आठ मंत्रालये सहभागी होत आहेत. भारताने पुढाकार घेतल्याने संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे केंद्र शासनाने प्रत्येक राज्यावर विविध उपक्रमांची जबाबदारी सोपविली आहे.
मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडून राज्यातील उपक्रमांच्या नियोजनाचा आढावा घेतला जात आहे. त्यामुळे कृषीसह महिला व बाल कल्याण, ग्रामविकास, आदिवासी विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय, नगरविकास, माहिती व जनसंपर्क आणि शालेय शिक्षण अशी विविध मंत्रालये या उपक्रमात सहभागी होणार आहेत.
“कृषी विभागाच्या उपक्रमांमध्ये एरवी इतर विभाग सहभागी होण्याचे टाळतात. मात्र पौष्टिक तृणधान्य वर्ष नियोजनाच्या राज्यस्तरीय समितीचे प्रमुख स्वतः मुख्य सचिव असल्यामुळे इतर मंत्रालयांना सहभागी व्हावेच लागेल. महिला व बालविकास विभागाकडून अंगणवाडी सेविकांमार्फत पालकांमध्ये जागरूकता आणली जाईल.
ग्रामविकास विभाग गावपातळीवर पाककृती स्पर्धा व प्रदर्शन भरवेल. तर सर्व शाळा, आश्रमशाळा, वसतिगृहे आणि दिव्यांग शाळांमध्ये भित्तिपत्रके लावली जातील. महापालिका हद्दींमधील उपक्रमांसाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना समन्वयाची जबाबदारी पार पाडावी लागेल,” अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
पौष्टिक तृणधान्याविषयी जागरूकता वाढल्यास बाजारपेठेत मागणी वाढू शकते. त्यामुळे माहिती व जनसंपर्क विभागाकडे माध्यमांमधून या पिकांची माहिती उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. शालेय शिक्षण विभाग विविध स्पर्धा, मिलेट दौड, आहारविषयक व्याख्याने आयोजित करेल. तर, प्रत्येक जिल्ह्यात आहार तज्ज्ञांच्या मदतीने विविध उपक्रम आयोजित करण्याची जबाबदारी आरोग्य विभागावर आहे.
...असा साजरा होणार पौष्टिक तृणधान्य महिना
जानेवारी ः बाजरी, फेब्रुवारी ः ज्वारी, ऑगस्ट ः राजगिरा, सप्टेंबर ः राळा, ऑक्टोबर ः वरई, डिसेंबर ः नाचणी. या प्रमाणे पौष्टिक तृणधान्याबाबत राज्यभर गावपातळीवर मोहीम राबवली जाणार आहे. त्यात संबंधित पिकाचे महत्त्व, पोषणमूल्य, उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान, कृषी विभागाचे योजनाविषयक धोरण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले जाणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.