
सोलापूर : सोलापूर- उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने हिस्सा दिल्यानंतर आता या मार्गासाठी भूसंपादनाची कार्यवाही जलदगतीने केली जात आहे. केंद्र सरकारच्या राजपत्रानुसार अनेकांची जमीन रेल्वे मार्गासाठी संपादित केली जाणार आहे. त्यावर शहरातील काहींनी हरकत घेत आमदार विजयकुमार देशमुख यांची भेट घेतली. त्यानंतर देशमुख यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. त्यावेळी हरकत घेण्याचा सल्ला जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.
नव्याने होणारा सोलापूर-उस्मानाबाद हा रेल्वेमार्ग उस्मानाबादला जोडला जाणार आहे. त्यासाठी सोलापूर शहरातील काहींच्या जागा संपादित होणार आहेत. तसेच बाळे, उत्तर सोलापूर तालुक्यातील देगाव, खेड, भोगाव, बाणेगाव, मार्डी, सेवालाल नगर, होनसळ या गावातील नागरिकांच्या जागा व जमिनी असे एकूण ३५ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. त्यासंबंधीचे राजपत्र शनिवारी (ता. १७) सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यात ज्यांची नावे होती, त्यातील काहींनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयकुमार देशमुख यांची भेट घेतली. संबंधित मालमत्ताधारकांच्या मान्यतेशिवाय त्यांची नावे राजपत्रात आल्याने त्यांचा संभ्रम वाढला. आमदार देशमुख यांनी तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी ज्यांना हरकत घ्यायची आहे, त्यांनी ताबडतोब हरकत नोंदवावी, असा सल्ला दिला. त्यानुसार आमदार देशमुख यांनी त्या लोकांना तसे सांगितले.
पालकमंत्री विखे-पाटलांनाही निवेदन
सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी काहींची खुली जागा, घरे व जमिनीचे संपादन केले जाणार आहे. त्यासाठी चांगला मोबदला संबंधितांना मिळेल. पण, त्या मालमत्ताधारकांची संमती आवश्यक असणार आहे. ज्यांची घरे बाधित होणार आहेत, त्यांची पंचाईत होणार असून, किती मोबदला मिळणार आहे, ही नेमकी माहितीदेखील त्यांना नाही. या पार्श्वभूमीवर काहीजण सोमवारी (ता. १९) हरकती नोंदवणार आहेत. आमदार विजयकुमार देशमुख हे स्वत: जिल्ह्याचे पालकमंत्री विखे-पाटील यांना नागरिकांच्या समस्या सांगणार आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.