
Onion Market Update Nashik : विविध अडचणींमुळे हजारो शेतकऱ्यांच्या ई-पीक (E-Peek Pahani) नोंदी झाल्या नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांना कांदा अनुदान (Onion Subsidy) मिळविण्यात आडकाठी निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी ई-पीकपेरा नोंदीची जाचक अट रद्द करावी, सरसकट सर्व कांद्याला अनुदान द्यावे. तसेच यंत्रणेला आदेश देऊन पीक नोंदणीचे कामकाज करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
चालू वर्षाच्या लेट खरीप कांद्याला उत्पादन खर्चाच्या खाली दर मिळाल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. यावर मोठा असंतोष उफाळून आल्याने अखेर राज्य सरकारने प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. ३ ते २० एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन पणन संचालकांनी केले आहे.
राज्यातील बाजार समित्या, खासगी बाजार, थेट पणन अनुज्ञप्ती धारकांकडे अथवा नाफेडकडे १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३५० रुपये व अधिकाधिक २०० क्विंटलच्या मर्यादेत प्रतिशेतकरी याप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. मात्र ई-पीकपाहणीतील पीक नोंदीचा अभाव आणि शासन निर्णयातील लाल कांदा हा उल्लेख अडचणीचा ठरण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.
दरम्यान, अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी ई-पीकपाहणी केलेली नाही. त्यामुळे सातबारा उताऱ्यात कांदा पीक अशी नोंद येत नाही. तसेच तलाठी लेखी प्रमाणपत्र देत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. तसेच पीकपेरा स्वयंघोषणा पत्र कृषी उत्पन्न बाजार समिती स्वीकारायला तयार नाहीत.
त्यामुळे अनुदानासाठी अर्ज केल्यानंतर तो नाकारण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय अनुदान मिळण्यासाठी लाल कांदा व ई-पीकपाहणी नोंद या अटीमध्ये बदल करून सरसकट कांद्याला अनुदान द्यावे, अशी मागणी होत आहे.
अडचणीचे मुद्दे अन् मागणी :
- अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत. ई-पीकपेरा नोंदणी करण्याची तांत्रिक माहिती नाही.
- मोबाईलचे नेटवर्क नसल्याने नोंदणीत अडचणी
- काही शेतकऱ्यांनी आंतरपीक म्हणून कांदा लागवड केली. मात्र त्याची नोंद झालेली नाही.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.