कृषी विभागासाठी होणार अधिकाऱ्यांची भरती

४०० गुणांच्या मुख्य परीक्षेनंतर (Main Examination) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा ५० गुणांची मुलाखत घेतली जाईल. त्यातील गुणवत्ताधारकांमधून कृषी विभागात (Agriculture Department) १९ नवे उपसंचालक निवडले जातील.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon

पुणे ः राज्य शासनाने कृषी विभागाला (Agriculture Department) बळकट करण्यासाठी पावले टाकली आहेत. या विभागात लवकरच २०० पेक्षा जास्त राजपत्रित कृषी अधिकारी नव्याने नियुक्त केले जाणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) भरती प्रक्रिया सुरू केली आहे.

आयोगाने गेल्या वर्षीच महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्वपरीक्षा घेतली होती. त्याचा निकाल याच आठवड्यात मंगळवारी (ता. १२) जाहीर करण्यात आला. या परीक्षेतील उत्तीर्ण पात्र उमेदवारांची मुख्य परीक्षा आता येत्या एक ऑक्टोबरला घेतली जाणार आहे. अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, मुंबई आणि पुणे अशा सहा ठिकाणी या परीक्षा घेतल्या जातील.

४०० गुणांच्या मुख्य परीक्षेनंतर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा ५० गुणांची मुलाखत घेतली जाईल. त्यातील गुणवत्ताधारकांमधून कृषी विभागात (Agriculture Department) १९ नवे उपसंचालक निवडले जातील. याशिवाय ६१ तालुका कृषी अधिकारी नेमले जाणार आहेत. कनिष्ठ व इतर ब संवर्गात १२३ नवे कृषी अधिकारीदेखील (Agriculture Officer)याचवेळी भरती केले जाणार आहेत.

लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षेसाठी कृषी विभागासाठी कृषी, कृषी अभियांत्रिकी किंवा उद्यानविद्या या विषयातील पदवीधारक विद्यार्थ्यांना पात्र ठरविले आहे. याशिवाय कृषी जैवतंत्रज्ञान, गृहविज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, अन्नतंत्र, सामाजिक विज्ञान, वनविद्या, मत्स विज्ञान, बी.एस्सी. एबीएम, बीबीएम कृषी, बीबीए कृषी या विद्याशाखेतील पदवीधारकदेखील समतूल्य म्हणून मान्य करण्यात आले आहेत. कृषी आयुक्तालयाने २०१० मध्ये तयार केलेल्या ‘महाराष्ट्र कृषी सेवा (सेवाप्रवेश) नियम’ या भरतीला लागू करण्यात आलेले आहेत.

‘जलसंपदा’लाही नवे अधिकारी मिळणार

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, लोकसेवा आयोगाकडून (MPSC) महसूल व वने, जलसंधारण, कृषी, जलसंपदा व बांधकाम अशा चार विभागांकरिता एकूण ५८८ पदे भरली जाणार आहेत. जलसंधारण विभागाकरिता याच परीक्षेतून ११ उपविभागीय जलसंधारण अधिकारी निवडले जाणार आहेत. जलसंपदा विभागात २० सहायक कार्यकारी स्थापत्य अभियंता, (गट अ), २१ सहायक स्थापत्य अभियंता आणि १३२ सहायक स्थापत्य अभियंता (गट ब) भरती केले जाणार आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com