
अॅग्रोवन वृत्तसेवा
बुलडाणा ः येथील भूसंपादन विभाग (Land Acquisition Department) उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी मध्यस्थ वकील व लिपिकासह तिघांना रंगेहाथ ताब्यात घेतल्याने महसूल विभागात एकच खळबळ उडाली. घुगे याच्यासह लिपिक नागोराव खरात याला ताब्यात घेण्यात आले आहे. मोताळा येथील एका वकिलामार्फत ही लाच स्वीकारण्यात आली. दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन परिसरात हा सापळा लावण्यात आला होता.
जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पामध्ये हिंगणे इच्छापूर येथील एका शेतकरी तक्रारदाराच्या वडिलांची जमीन भूसंपादीत करण्यात आली होती. दीड एकराच्या या जमिनीचा मोबदला सरकारकडून जमाही झाला. मोबदल्याची रक्कम तक्रारदाराच्या चुलत्याच्या खात्यावर जमा झाली. अर्थात ही चूक भूसंपादन विभागाची होती. तक्रारकर्त्याच्या वडिलांचे नाव ‘रवींद्र’ आणि चुलत्याचे ‘राजेंद्र’ आहे. रवींद्रच्या ऐवजी राजेंद्र झाल्यामुळे रक्कम तक्रारकर्त्याला मिळत नव्हती. दरम्यान तक्रारदाराच्या वडिलांचा मृत्यू झाला.
भूसंपादन विभागाची ही चूक दुरुस्तीसाठी तक्रारदार शेतकऱ्याकडूनच एक लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. लिपिकामार्फत ही रक्कम वकील अनंत देशमुख याला देण्याचे ठरले. या बाबत शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली. त्यानुसार सापळा लावून कारवाई करण्यात आली. तक्रारदार शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागात पोहोचल्यानंतर तेथे वकील आणि लिपिक खरात यांनी रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने उपजिल्हाधिकारी घुगे, लिपिक खरात आणि संबंधित वकील अशा तिघांना पकडले. घुगे यांना यापूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यातही लाच घेताना पकडल्याची चर्चा जिल्ह्यात होत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.