
मालेगाव, जि. नाशिक : मालेगाव बाजार समितीच्या (Market Committee) मुंगसे येथील कांदा (Onion) विक्री केंद्रावर व्यापाऱ्याने अरेरावी करून लिलाव व पेमेंटसाठी जाणीवपूर्वक ताटकळत ठेवले गेले, अशी तक्रार देवारपाडे (ता. मालेगाव) येथील शेतकरी कमलेश घुमरे यांनी बाजार समितीकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कांदा विक्रीसाठी गेले असता त्यांना दिवसभरात लिलाव करण्याच्या व विकलेल्या मालाचे पैसे देण्याच्या माध्यमातून त्रास दिला गेला. तुला काय करायचंय करून घे, अशा अरेरावीच्या भाषेत दमबाजीदेखील केल्याचे सचिव अशोक देसले यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
सोमवारी (ता. २८) मुंगसे मार्केटमध्ये कांदा विक्रीसाठी गेले असता लिलावासाठी ट्रॅक्टर लावण्यात आला. तब्बल दीड तासानंतर व्यापारी आले. त्या वेळी त्याच्या कांद्याला ५८० रुपये भाव दिला. परंतु, पावती दिली नाही. त्यानंतर थोड्या वेळाने व्यापाऱ्याकडे पावतीची मागणी केली असता, आम्ही तुझा कांदा बघितलाच नाही, असे उत्तर दिले.
त्यानंतर आलेल्या सर्व ट्रॅक्टरचा लिलाव आटोपल्यावर कमलेशने व्यापाऱ्यांना कांद्याचा लिलाव करण्याची विनंती केल्यानंतर १० ते १२ व्यापाऱ्यांपैकी फक्त दोनच व्यापारी लिलावासाठी तयार झाले. त्यावर घुमरे यांनी सर्व व्यापारी येत असतील तरच लिलाव करेल, अशी भूमिका घेतली. त्यानंतरही व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. अखेर कांद्याला सहाशे रुपये भाव मिळाला; मात्र, दिवसभर यासाठी तिष्ठत राहावे लागले. काटा करून मालाचे पैसे देण्यासाठीदेखील दीड ते दोन तास वेठीस धरले. शिवाय आता पैसे नाहीत उद्या या, असे टोलवाटोलवीचे उत्तर मिळाले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
'परवान रद्द करा'
मुंगसे येथील स्थानिक व्यापारी असून, शेतमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना नेहमी अशीच वागणूक देत असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले. या व्यापाऱ्यांवर कारवाई करावी अथवा परवाना रद्द करण्यात यावा, अशी मागणी या शेतकऱ्याने केली आहे.
शेतकऱ्याच्या प्रकरणावर सविस्तर माहिती घेऊन यासंबंधी व्यापारी व शेतकरी यांच्यात समन्वय ठेवण्याबद्दल सूचना देण्यात आल्या आहेत. कामकाज सुधारणांबाबत तसे कळविण्यात आले आहे. शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही. - अशोक देसले, सचिव-बाजार समिती, मालेगाव
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.