नोटाबंदी काळात अडकलेले कांद्याचे पैसे त्वरित द्यावेत

प्रहार शेतकरी संघटनेचे राहुटी आंदोलन
नोटाबंदी काळात अडकलेले कांद्याचे पैसे त्वरित द्यावेत

ॲग्रोवन वृत्तसेवा

देवळा, जि. नाशिक : नोटाबंदी काळातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे (Onion Producer Farmers) अडकलेले पैसे मिळावेत, या मागणीसाठी प्रहार शेतकरी संघटनेच्या (Prahar Shetkari Sanghatna) वतीने येथील जुन्या तहसील कार्यालयासमोर सोमवारी (ता. १२) प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय दहीवडकर, उपजिल्हाध्यक्ष कृष्णा जाधव यांच्या नेतृत्वाखाली राहुट्या टाकून अनोखे आंदोलन करण्यात आले.

नायब तहसीलदार विजय बनसोड यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत संबंधित व्यापाऱ्यांवर आरसीसीअंतर्गत केलेल्या कार्यवाहीबाबत माहिती दिली. पुन्हा लिलावाची प्रक्रिया नियमानुसार राबविण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगितल्याने सायंकाळी उशिरा आंदोलन मागे घेण्यात आले.

नोटाबंदी काळात अडकलेले कांद्याचे पैसे त्वरित द्यावेत
Onion Market: कांदा उत्पादक शेतकरी तोट्यात का?

तालुक्यातील स्व. निवृत्तिकाका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत नोटाबंदी काळातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे व्यापाऱ्यांकडे अडकले आहेत. शेकडो शेतकऱ्यांनी २०१७-१८ या वर्षी उमराणा बाजार समितीत कांदा विक्री केला. नोटाबंदीचे कारण पुढे करून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने आर्थिक फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी अनेक वेळा बाजार समिती प्रशासन, सहायक निबंधक सहकारी संस्था, जिल्हा उपनिबंधक, पणन संचालक, सहकार मंत्र्यांकडे लेखी पत्राद्वारे तक्रारी दाखल केल्या. परंतु अद्याप कोणतीही थेट कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे कांदा व्यापाऱ्यांकडून पैसे मिळावेत, यासाठी देवळा तालुका प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने राहुटी झोपडी आंदोलन करण्यात आले.

प्रहार शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष दशरथ पूरकर, उपतालुकाध्यक्ष हरिसिंग ठोके, शेतकरी सोनवणे, दिलीप सोनवणे, कडू देवरे, जगन्नाथ सोनवणे, रामदास बागूल, श्रावण रामभाऊ, नवनाथ साळुंखे, जिभाऊ वाघ, बिबाबाई देवरे यांच्यासह कांदा उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते. देवळा बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक योगेश आहेर, कांदा उत्पादक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयदीप भदाने, राज्य संपर्कप्रमुख कुबेर जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शिरसाठ आदींनी या आंदोलनास भेट देत पाठिंबा दर्शवला. वाघ्या- मुरळी पथकाने उमराणा बाजार समिती प्रशासन व व्यापाऱ्यांची अब्रू वेशीवर टांगत गीते सादर केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com