
नांदेड : ई-पीकपाहणी (E-Peek Pahani) मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना स्वतःच्या पिकांचा पेरा स्वत:च मोबाईल ॲपच्या (Mobile App) माध्यमातून नोंदण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
नोंदणीची १५ जानेवारी अंतिम तारीख होती. परंतु रब्बीमध्ये तीन लाख ६६ हजार हेक्टर पेरणी क्षेत्रापेकी आजपर्यंत २५ टक्क्यांनुसार केवळ ९० हजार ७८४ हेक्टरवरील पिकांचा पेरा नोंदविला आहे. यामुळे ‘एमएसपी’अंतर्गत हरभरा (Chana) विक्रीसाठी शेतकऱ्यांना मोठी अडचण ठरणार आहे.
राज्य शासनाने मागीलवर्षी खरीप हंगामापासून ई-पीकपाहणी ॲप सुरू केले आहे. महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या वतीने ई-पीकपाहणी हा प्रकल्प राबवण्यात येतो.
जिल्ह्यात खरीप हंगामात पेरा नोंदणी केल्यानंतर रब्बीमध्येही शेतकऱ्यांनी पेरा नोंदविण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. ता. १५ ऑगस्टपासून पेरा नोंदणीला सुरुवात झाली, तर १५ जानेवारीपर्यंत पेरा नोंदण्यासाठी मुदत देण्यात आली होती.
परंतु शेतकऱ्यांचा यास अल्प प्रतिसाद मिळाला. कृषी विभागाने यंदा तीन लाख ५६ हजार ९२५ हेक्टरवर रब्बीमध्ये पेरा झाल्याचे कृषी विभागाने सांगितले.
यात अडीच लाख हेक्टरवर हरभरा पेरला गेला आहे. परंतु पेरा नोंदणीची मुदत १५ जानेवारी रोजी संपली. या पेरा नोंदणीसाठी अद्याप मुदतवाढ कळविण्यात आली नाही.
यामुळे मुदतीत २४.७४ टक्क्यांनुसार जिल्ह्यातील ९० हजार ७८४ हेक्टरसाठी पेरा नोंदविला आहे. ऑनलाइन पेरा नोंद घेण्याची जबाबदारी शेतकऱ्यांची आहे.
प्रशासनाने मोहीम स्वरूपात पेरा नोंदणीसाठी कार्यक्रम राबविला. परंतु यास फारसे यश आले नसल्याचे दिसून आले आहे.
शासनाने आगामी काळात या कामाला मुदतवाढ देऊन शेतकऱ्यांत व्यापक जनजागृती केली, तरच पेरा नोंदणीच्या कामाला गती येईल, अन्यथा हरभरा विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
हरभरा विक्रीसाठी येणार अडचण
शेतकऱ्यांना किमान हमी दरानुसार हरभरा विक्री करण्यासाठी प्रारंभी ई-पीक मोहिमेतर्गत पेरा नोंदणी करावी लागणार आहे. या वेळी ऑनलाइन पेरा नोंदलेला सातबारा आवश्यक असतो. परंतु अनेक शेतकऱ्यांनी पीकपेरा नोंदला नसल्याने शेतकऱ्यांना हरभरा विक्रीसाठी अडचण येऊ शकते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.