निसर्ग जपला तरच शाश्वत विकास शक्य

वसुंधरेची जपणूक करून शाश्वत विकासाकडे वाटचाल करावी लागणार आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपण सर्वजण मिळून ही जबाबदारी पार पाडूया, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
Uddhav Thackeray
Uddhav ThackerayAgrowon

मुंबईः वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे विविध आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. निसर्गाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे वसुंधरेची जपणूक करून शाश्वत विकासाकडे वाटचाल करावी लागणार आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपण सर्वजण मिळून ही जबाबदारी पार पाडूया, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

वातावरणीय बदलाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून समृद्ध पर्यावरण निर्माण करण्यासाठी ‘माझी वसुंधरा अभियान २.०’ हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्यात येत आहे.

याअंतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक संस्था, विभागीय व जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांचा सन्मान जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड, सदस्य सचिव अशोक शिनगारे आदी उपस्थित होते.

पर्यावरणाच्या रक्षणासाठी लोकसहभाग महत्त्वाचाः अजित पवार

कोणत्याही उपक्रमात लोकसहभाग अंतर्भूत असला की त्यात यश नक्कीच मिळते, असे सांगून उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यासाठी यापुढे २०० कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, असे जाहीर केले. या माध्यमातून माझी वसुंधरा अभियानाद्वारे पर्यावरण रक्षणासाठी काटेकोर उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी सांगितले.

राज्यात पर्यावरण संवर्धनासाठी उपाययोजनांचा भाग म्हणून एसटी महामंडळाअंतर्गत टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रीक वाहने घेण्यात येणार असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांच्या मनावर पर्यावरणपूरक बाबी बिंबविण्यासाठी अभ्यासक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न व्हावा असेही ते म्हणाले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरण आणि पर्यटन हे दोन्ही विभाग उत्कृष्ट काम करीत असल्याबद्दल त्यांनी विशेष कौतुक केले.

स्वच्छता ही संस्कृती बनावीः बाळासाहेब थोरात

स्वच्छता, माझी वसुंधरा हे अभियान ही केवळ रोज राबविण्याची बाब नाही तर ती जनमानसात रूजून आपली संस्कृती बनली पाहिजे, असे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. मागील दोन वर्षांच्या कठीण काळात सर्वच अधिकाऱ्यांनी प्रत्येक विभागात केलेल्या उत्कृष्ट कामाचे मोजमाप करता येणार नाही.

पर्यावरण दिनानिमित्त त्यांच्या कार्याचा सन्मान होत आहे ही आनंदाची बाब असून अशाच इतरही चांगल्या कामांची जाणीव सर्वांना झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. पर्यावरण, पर्यटन या विभागांमध्ये चांगली कामे होत असल्याचे सांगून त्यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांचे कौतुक केले. पुढील वर्षी पारितोषिकांचा हा कार्यक्रम यापेक्षाही मोठ्या स्वरूपात घ्यावा, असे ते म्हणाले.

‘इज ऑफ लिव्हिंग’साठी काम करायचे आहेः आदित्य ठाकरे

पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करतानाच शाश्वत विकास साधून नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी काम करायचे आहे, असे प्रतिपादन पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनोगताद्वारे व्यक्त केले. प्रास्ताविकाद्वारे प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी माझी वसुंधरा अभियानाच्या दोन टप्प्यांची माहिती देऊन या अभियानाच्या वाटचालीचा आढावा घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com