
बाळासाहेब पाटील ः ॲग्रोवन वृत्तसेवा
Maharashtra Budget Session 2023 मुंबई : विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे तोवर कृषिपंपांची (Agriculture Pump) वीजजोडणी तोडू (Power Supply) नका. २४ मार्च ते ३१ मार्चअखेर वीज तोडण्याचे निर्देश महावितरणच्या अधिकाऱ्यांना सरकारतर्फे देण्यात आले आहेत, असा आरोप जयंत पाटील (Jayant Patil) यांनी गुरुवारी (ता. २) विधानसभेत केला.
तसेच ४६ हजार कोटींची कृषिपंपांची थकबाकी सरकारने माफ करावी, अशी मागणी विधानसभेत पाटील यांनी कामकाजाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर केली.
मात्र असे कुठलेही निर्देश दिलेले नाहीत, अशी स्पष्टोक्ती ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
तरीही विरोधकांचे समाधान झाले नाही. तसेच इंधनावरील व्हॅट कमी करण्याच्या मुद्द्यावर जोरदार खडाजंगी झाली. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.
प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर कामकाजाचा मुद्दा उपस्थित करत जयंत पाटील यांनी कृषिपंपांचे कनेक्शन तोडण्याचा आणि थकबाकीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, की महावितरणच्या अधिकाऱ्यांची सरकारी पातळीवर बुधवारी बैठक घेण्यात आली आहे.
या बैठकीत अधिवेशन कालावधीत वीज तोडण्यात येऊ नयेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. मुळात महावितरणची ४६ हजार कोटींची थकबाकी आहे. ही थकबाकी माफ झाली पाहिजे, अशी मागणी केली.
यावर ऊर्जामंत्री फडणवीस यांनी असे कुठलेही आदेश दिलेले नाहीत. ज्या शेतकऱ्यांनी आठ- आठ वर्षे वीजबिल थकवले आहे, त्यांच्यावर कारवाईचे निर्देश दिले आहेत. अन्य शेतकऱ्यांकडे तगादा लावलेला नाही.
त्यामुळे केवळ प्रसिद्धीसाठी हा खटाटोप केला जात आहे. हे राजकीय भाष्य आहे, असा आरोप केला.
त्यानंतर अध्यक्ष नार्वेकर यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चा पुकारल्याने विरोधकांनी गोंधळ घातला. तसेच जयंत पाटील यांनी इंधनावरील व्हॅट कमी करावा, अशी मागणी केली होती.
त्यास उत्तर देताना फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात इंधनावरील एक नवा पैसाही व्हॅट कमी केला नाही, असे सांगताच विरोधक प्रचंड आक्रमक झाले. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.
भुजबळ यांची कोंडी
राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार सभात्याग करून बाहेर जात असताना अध्यक्षांनी पुढील कामकाज पुकारले. त्या वेळी चर्चेसाठी छगन भुजबळ यांचे नाव पुकारले. मात्र विरोधी आमदारांनी त्यांना बाहेर बोलावले. त्यामुळे त्यांना बोलावे की बोलू नये, असा प्रश्न पडला.
काँग्रेसच्या आमदारांनी त्यांना बाहेर जाण्याबाबत खुणावल्यानंतर भुजबळ काही मिनिटांसाठी बाहेर गेले आणि आशिष शेलार बोलायला सुरू करणार इतक्यात ते धावत आले. मी बोलणार असे सांगत शेलार यांना थांबवले.
शेलार यांनीही हसत हसत खाली बसून बोलण्याची संधी दिली. अध्यक्ष नार्वेकर यांनी ‘भुजबळ साहेब, आत बाहेर आत बाहेर बरोबर नाही’ असे सांगताच हशा पिकला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.