Orange : बांगलादेशच्या धोरणामुळे संत्रा उत्पादक जेरीस

आयात शुल्कात दुपटीने वाढ; बाजारपेठ शोधताना दमछाक
Orange
OrangeAgrowon

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा
नागपूर : बांगलादेशकडून आयात शुल्कात (Import cost) सातत्याने होणारी वाढ, उद्‍घाटनानंतरही रखडलेले प्रक्रिया उद्योग (Processing) या कारणांमुळे संत्र्यांना देशांतर्गत बाजारपेठ शोधण्यासाठी उत्पादकांची चांगलीच दमछाक होत आहे.

Orange
Orange : संत्रा बागायतदार वाय-बहरमुळे जेरीस

राज्यात सुमारे दीड लाख हेक्टरवर संत्रा लागवड आहे. त्यापैकी अमरावती जिल्ह्यात लागवडीखालील एक लाख हेक्टर क्षेत्र आहे. ऑरेंज सिटी अशी ओळख असलेल्या नागपूरमध्ये अवघे २५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. उर्वरित राज्याचे क्षेत्र २५००० हेक्टर आहे. या माध्यमातून सुमारे पाच लाख टन इतके उत्पादन होते. आंबट गोड चव, सोलून खाता येणारा आणि टेबल फ्रूट अशी वैशिष्ट्ये नागपुरी संत्र्यांनी जपली आहेत. त्यामुळेच देशाच्या काही भागांतून नागपुरी संत्र्यांना मागणी राहते. परंतु एकूण उत्पादकता आणि मागणीत तफावत असल्याने नागपुरी संत्र्यांची निर्यात होणे अपेक्षित आहे. त्याशिवाय उत्पादकांना दर मिळत नाही, असा अनुभव आहे. मात्र टिकवण क्षमता कमी असणे हा निर्यातीमधील सर्वांत मोठा अडसर ठरतो.

Orange
संत्रा उत्पादक मदतीपासून वंचित

गेल्या काही वर्षांपासून नागपुरी संत्र्यांचा बांगलादेश हा एकमेव आयातदार ठरला आहे. ८० हजार ते एक लाख टन इतक्या मोठ्या प्रमाणावर बांगलादेशकडून नागपुरी संत्र्यांची आयात होते. मात्र नागपुरी संत्र्यांचा आपणच एकमेव आयातदार आहोत, या भावनेतून बांगलादेशने आयात शुल्कात सातत्याने वाढ केली. त्याचा फटका निर्यातीला बसला आहे.

नवअनंत शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष राकेश मानकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘बांगलादेशकडून आंबिया बहरातील संत्र्यांना सर्वाधिक मागणी राहते. गेल्या वर्षी २७ ते २८ ट्रक संत्र्यांची झाली. या वेळी मात्र नोव्हेंबर महिन्यात अचानक बांगलादेशने आयात शुल्क वाढविले. परिणामी, रस्त्यात असलेले काही ट्रक माघारी बोलवावे लागले. व्यापाऱ्यांशी संपर्क करून कोलकाता भागांत या संत्र्यांची विक्री केली. एका ट्रकमध्ये सरासरी ९५० क्रेट (२५-२६ टन) संत्र्या राहतात. निर्यात होत असल्याने ३२ ते ३५ हजार रुपये टनांपर्यंत दर पोहोचले होते. ‘महाऑरेंज’ने या मुद्द्यावर सातत्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. त्यांनी वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्यामार्फत बांगलादेश सरकारसोबत पत्रव्यवहार केला. परंतु त्यातून ठोस काहीच हाती लागले नाही.’’

महाऑरेंजचे संचालक मनोज जवंजाळ म्हणाले, ‘‘नागपुरी संत्र्यांवर प्रक्रिया व्हावी, याकरिता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने कोकाकोला-जैन यांच्या माध्यमातून ठाणाठुणीवणी येथे प्रक्रिया उद्योगाची पायाभरणी झाली होती. ५०० टन प्रतिदिवस अशी या प्रकल्पाची क्षमता आहे. मिहान येथे रामदेव बाबा यांच्या पतंजलीमार्फत १००० टन प्रति दिवस क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित होते. त्याकरिता जागा देण्यात आली. मात्र हा प्रकल्पदेखील मार्गी लागला नाही. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत संत्रा विकण्याशिवाय उत्पादकांसमोर अन्य कोणताच पर्याय नाही.’’
---

...अशी केली आयात शुल्कात वाढ (रुपयांत प्रतिकिलो)
२०१९ - २०
२०२० - ३०
२०२१ - ५१
२०२२ - ६३
--

कोट ः
ऑगस्टमध्ये संत्रा हिरवा राहतो. त्यामुळे चांगल्या प्रतीचा संत्रा मिळावा, या साठी ऑक्टोबर ते डिसेंबर या महिन्यांत बांगलादेशकडून खरेदी होते. २० रुपये किलो संत्रा आणि ६३ रुपये प्रतिकिलो आयात शुल्क अपेक्षित धरता ८३ रुपयांचा दर होतो. आयातदार त्यामुळे कमी दरात संत्र्यांची मागणी करतात. परिणामी, देशांतर्गत बाजारपेठेत संत्रा दर गडगडतात. या प्रकरणी सरकारने हस्तक्षेप करावा.
- राकेश मानकर, अध्यक्ष,
नवअनंत शेतकरी उत्पादक कंपनी, मोहपा, नागपूर
---
बांगलादेशमधून भारतात कापड आयात होते. केंद्र सरकारने ‘जशास
तसे’ या धोरणांतर्गत कापडावरील आयात शुल्क वाढविले पाहिजे. त्याशिवाय बांगलादेश वठणीवर येणार नाही.
- मनोज जवंजाळ,
संचालक, महाऑरेंज

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com