Crop Loan : वाढीव व्याजदरामुळे संत्रा बागायतदार जेरीस

पारंपरिक पीक लागवडकर्त्या शेतकऱ्यांकडून पीककर्जासाठी दोन टक्‍के व्याजाची आकारणी होत असताना संत्रा व तत्सम फळपीक घेणाऱ्यांना मात्र यासाठी १४ ते १५ टक्‍के व्याज द्यावे लागत आहे.
Nagpur Orange
Nagpur OrangeAgrowon

नागपूर ः पारंपरिक पीक लागवडकर्त्या शेतकऱ्यांकडून पीककर्जासाठी (Crop Loan) दोन टक्‍के व्याजाची (Crop Loan Interest) आकारणी होत असताना संत्रा (Orange) व तत्सम फळपीक घेणाऱ्यांना मात्र यासाठी १४ ते १५ टक्‍के व्याज द्यावे लागत आहे.

त्यामुळे सहा वर्षांनंतर फळधारणा होणाऱ्या संत्र्याकरिता एक लाख रुपये कर्ज घेतल्यास सातव्या वर्षी संत्रा उत्पादकांना व्याजासह तब्बल तीन लाख रुपयांचा भरणा करावा लागतो. परिणामी, फळपिकाचा व्याजदर कमी करावा, अशी मागणी ‘महाऑरेंज’ने (MahaOrange) केली आहे.

Nagpur Orange
Orange Farmers : संत्रा-मोसंबी फळपीक उत्पादकांसाठी धोरण ठरवा

‘महाऑरेंज’चे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे यांनी या संदर्भाने माहिती दिली. त्यानुसार, सोयाबीन आणि कपाशी व तत्सम पारंपरिक पिकांसाठी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी दोन टक्‍के व्याज आकारले जाते.

त्यातही राज्य सरकारकडून नियमित कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज सवलतीचा फायदा दिला जातो.

फळ हे देखील पीक श्रेणीत असताना त्याच्याकरिता मात्र पीककर्जाचे निकष वेगळे ठरविण्यात आले आहेत. १५ टक्‍के इतका प्रचंड व्याज दर संत्रा फळ बागायतदारांसाठी आकारला जातो.

Nagpur Orange
Orange GI : भौगोलिक मानांकनासाठी राज्यात २५० संत्रा उत्पादकांची नोंदणी

याचा विचार करता एखाद्या संत्रा बागायतदाराने एक लाख कर्ज घेतल्यास पहिल्या वर्षी १५ हजार रुपये व्याज, ते थकीत राहिल्यास एक लाख १५ हजार रुपये मूळ रक्‍कम निश्‍चित करून व या रकमेवर पुन्हा १५ टक्‍के दराने व्याजाची आकारणी होत अशाप्रकारे व्याज दर वाढत राहते. एक लाख रुपये घेतले असल्यास सातव्या वर्षी त्याला तीन लाख रुपये भरावे लागतात.

शिफारशीनुसार सहाव्या वर्षापासून संत्रा फळ व्यावसायिक स्तरावर घेण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे सहाव्या वर्षापर्यंत बागायतदाराला उत्पन्नच मिळत नसल्याने या पिकाच्या व्यवस्थापनावर त्याला स्वतःकडील रक्‍कम खर्च करावी लागते.

त्यातच व्याज दर वाढीव असल्याने तो भरण्यासही असमर्थ ठरत थकबाकीदार होतो, अशी अनेक उदाहरणे आहेत. परिणामी, राज्य शासनाने यात हस्तक्षेप करीत संत्रा फळपीकासाठीचा व्याजदर नियंत्रणात आणत तो ५ टक्‍के केला पाहिजे.

या मुद्यांवरही काम होण्याची गरज

- द्राक्षाप्रमाणे संत्रा पिकात थिनिंग होणे आवश्‍यक.

- त्याला सरकारी पातळीवर प्रोत्साहन.

- संत्रा-मोसंबी व्यवस्थापन शास्त्रशुद्ध होणे.

- त्याकरिता इतर देशातील शास्त्रज्ञांची मदत घेतली पाहिजे.

- उत्पन्न वाढविणे, मार्केटिंग नेटवर्क तयार करणे.

- लहान फळांचा उपयोग व्हावा याकरिता प्रक्रिया उद्योगाची उभारणी.

- दर्जेदार फळ उत्पादनासाठी निरोगी कलमांचा पुरवठा.

पीककर्ज म्हणताना फळपिकांसाठी व्याज दर अव्वाच्या सव्वा आहेत. पारंपरिक पीक लागवडीसाठी कर्ज घेताना दोन टक्‍के व्याज आकारले जाते. याउलट संत्रा फळ पिकासाठी हाच व्याजदर १५ टक्‍के आहे. त्यामुळे नवी पिढी संत्रा लागवडीकरिता धजत नाही. हा व्याज दर कमी करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न होणे अपेक्षित आहे. महाऑरेंजकडून या विषयावर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.

- श्रीधर ठाकरे,कार्यकारी संचालक, महाऑरेंज

मोठ्या क्षेत्रावर संत्रा लागवड करणारे अनेक शेतकरी व्याज अधिक असल्याने दिवाळखोर झाले आहेत. थकबाकीदारांची संख्याही अधिक आहे. जगात फळपीक लागवड कर्जासाठी दोन ते चार टक्‍के इतकाच व्याज दर आकारला जातो. भारतात मात्र हा १५ टक्‍के इतका अधिक आहे. परिणामी तो कमी झाला पाहिजे.

- मनोज जवंजाळ, संत्रा उत्पादक शेतकरी, काटोल, नागपूर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com