
Paddy Procurement News गोंदिया : पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमधील धान उत्पादक (Paddy Farmer) शेतकऱ्यांसाठी आम्ही लॉजिस्टीक कॉरिडॉर (Logistic Corridor) तयार करत आहोत. धानाला बोनस (Paddy Bonus) देण्याची पद्धतही बदलली आहे.
आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात बोनसची रक्कम जमा होते. आम्ही तयार करत असलेली इकोसिस्टिम शेतकऱ्यांना थेट आंतरराष्ट्रीय बाजाराशी जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांनी केले.
खासदार प्रफुल्ल पटेल यांचे वडील स्व. मनोहरभाई पटेल ११७ वी जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर खासदार पटेल, स्टील उद्योजक सज्जन जिंदल, अभिनेते जॅकी श्रॉफ, माजी आमदार प्रकाश गजभिये, डॉ. परिणय फुके, आमदार अभिजित वंजारी, आमदार विजय रहांगडाले, आमदार विनोद अग्रवाल आदी होते.
फडणवीस पुढे म्हणाले, की सज्जन जिंदल यांनी विदर्भात गुंतवणूक करावी. कारण आम्ही विदर्भाला स्टील हब बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा विदर्भाला मोठा लाभ होणार आहे. ज्या प्रकारच्या पायाभूत सुविधा आम्ही उपलब्ध करीत आहोत.
त्यामध्ये समृद्धी महामार्ग आम्ही आता गोंदियापर्यंत आणत आहोत. सोबतच गडचिरोलीपर्यंत हा मार्ग आम्ही नेणार आहोत. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांची कनेक्टिव्हिटी आम्ही तयार करत आहोत.
राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आज मला स्व. मनोहरभाई पटेल यांना आदरांजली अर्पण करण्याची संधी मला दिली. त्यांनी निमंत्रण दिले आणि मी आलो. आता मी येथे आलो आहे, आपणही आहात.
त्यामुळे चर्चा तर होणारच. ‘बात निकली है, तो दूर तक जाएगी’. नागपूर, लातूरपर्यंतही चर्चा होणारच आहे. पण त्याची चिंता करण्याची गरज नाही.
कारण महाराष्ट्राची संस्कृती फार वेगळी आणि चांगली आहे. राजकारण करताना आम्ही लोक विचारांनी वेगळे असतो.
आम्ही लोक विचारांचे विरोधक असतो, व्यक्तींचे विरोधक नसतो. राजकारणात, निवडणुकांमध्ये आपण एकमेकांच्या विरोधात असतो.
पण आपण एकत्र बसून चहा पितो. एका मंचावर आपण येतो. ही आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीच विशेषतः आहे.
ही संस्कृती आपल्यासोबत आहे. त्यामुळे आपल्याला आणि महाराष्ट्राच्या विकासाला कुणीही थांबवू शकत नाही, असे फडणवीस म्हणाले.
मेडिकल, अभियांत्रिकी, पॉलिटेक्निकचे शिक्षण मराठीतून सुरू करणार आहे. यामुळे इंग्रजीमध्ये कमजोर असलेले विद्यार्थी आता हे उच्च आणि तंत्रशिक्षण घेऊ शकणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रादेशिक भाषांमध्ये शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे, असेही फडणवीस म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.