Agriculture Irrigation : पालखेड धरण-कालव्याला मिळणार झळाळी

निफाड, येवला तालुक्यांतील शेतीसिंचनासाठी वरदान ठरलेल्या पालखेड धरण व डावा कालव्याला झळाळी मिळणार आहे.
Palkhed Dam
Palkhed DamAgrowon

पिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : निफाड, येवला तालुक्यांतील शेतीसिंचनासाठी (Agriculture Irrigation) वरदान ठरलेल्या पालखेड धरण (Palkhed Dam) व डावा कालव्याला झळाळी मिळणार आहे. एशियन डेव्हलपमेंट बॅंकेकडून (Asian Development Bank) नाममात्र व्याजदराने धरण व कालव्याच्या नूतनीकरणासाठी दोनशे कोटींचे कर्ज मिळणे दृष्टिक्षेपात आहे.

तसे झाल्यास पुढील पन्नास वर्षे धरण व कालव्याचे आर्युमान वाढणार असून कालवा फुटणे, पाण्याची गळती असे अपव्यय टळणार आहेत. पाणी मुबलक मिळून कार्यक्षेत्रातील दोन तालुके सुजलाम्‌-सुफलाम्‌ होण्यास मदत मिळणार आहे.

Palkhed Dam
Rabi Irrigation : ‘कडवा’, भोजापूर’मधून रब्बीसाठी आवर्तन

१९७२ मध्ये पालखेड धरणाची उभारणी झाली. दिंडोरी तालुक्याचा पूर्वभाग, निफाड, येवला असा १२८ किमी अंतराचा डावा कालवा उभारला गेल्याने त्या वेळच्या जिरायत शेतीला वरदान ठरून हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली येऊन परिसर बागायत बनला. निफाड तालुक्यात द्राक्षबागा फुलविण्यात व शेतकऱ्यांना परकीय चलन मिळवून देण्यात पालखेड धरणाचा सिंहाचा वाटा राहिला आहे.

पण हे धरण व कालवा उभारून पन्नास वर्षे लोटली आहेत. कालव्यात सध्या गाळ साचून ७५० दशलक्ष घनफूट पाण्याच्या क्षमतेत घट झाली. कालवे जीर्ण झाल्याने अनेक ठिकाणी गळती तर आवर्तनावेळी कालव्यांना भगदाड पडून पाण्याचा अपव्यय झाला.

पालखेड पाटबंधारे विभागाने चार वर्षांपूर्वी धरण व कालव्याच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे प्रस्ताव दिले होते. पण निधीअभावी हे काम रखडले.

Palkhed Dam
Canal Irrigation : कालवा सिंचनाचा अंत अटळ आहे का?

पालखेड पाटबंधारे विभागातर्फे एशियन डेव्हलपमेंट बॅंकेच्या अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले. ‘एडीबी’चे फ्रान्स येथील जलसंपदा विभागाचे तज्ज्ञ डॅनियल रेनॉल्ट, सीडब्लूसी या केंद्रीय संस्थेच्या अधिकाऱ्यांनी थेट धरण व कालव्याची पाहणी करून स्थिती जाणून घेतली.

पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता संजय बेलसरे यांनी धरणाबाबत माहिती विशद केली. सुमारे दोनशे कोटींचे अंदाजपत्रक त्यांनी अधिकाऱ्यांसमोर ठेवले. त्यावर ‘एडीबी’ अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

अधिकचे क्षेत्र सिंचनाखाली

कर्जरूपी निधी उपलब्ध झाल्यास धरणाच्या भिंतीचे व कालव्याचे मजबुतीकरण, आधुनिकीकरण होणार आहे. येत्या सहा महिन्यांत हे काम सुरू होण्याची शक्यता असून पुढील वर्षभरात धरण व कालव्याला झळाळी मिळेल.

कालवा सक्षमीकरणामुळे अधिकचे क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकेल. या वेळी आमदार दिलीप बनकर, कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने, उपकार्यकारी अभियंता राजेंद्र बधान, पिंपळगावचे उपअभियंता प्रशांत गोवर्धने, संजय सोनवणे, संभाजी पाटील आदी उपस्थित होते.

पालखेड धरणामुळे निफाड तालुक्यातील शेतीचे मोठे क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. पन्नास वर्षे जुन्या कालव्यामुळे गळती व कालवा फुटीच्या समस्या उद्भवत आहेत. यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. एशियन डेव्हलपमेंट बॅंकेने नाममात्र व्याजदरावर कर्ज देण्याची भूमिका घेतल्याने धरण व कालव्याचे नूतनीकरण होऊन पुढील पन्नास वर्षाचा जलअपव्यय टळणार आहे.

- दिलीप बनकर, आमदार

एशियन डेव्हलपमेंट बॅंकेच्या वतीने महाराष्ट्रातील पहिल्याच रॅप मास्कोट कार्यशाळेचे नाशिकमध्ये आयोजन करण्यात आले. त्यात पालखेड धरणाचे आधुनिकीकरण हा मुद्दा केंद्रस्थानी होता. अधिकाऱ्यांनी धरण व कालव्याला भेट देऊन कर्जरूपी निधी देण्याला सकारात्मक प्रतिसाद दिला.

- संजय बेलसरे, मुख्य अभियंता, पाटबंधारे विभाग

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com