
कोल्हापूर : जिल्ह्यात पंचगंगा प्रदूषणाचा (Panchaganga Pollution) प्रश्न गंभीर होत चालला असून शासनाने तातडीची बैठक घेऊन याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्याकडे केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून पंचगंगा प्रदूषणाबाबत सातत्याने आंदोलन व उपाययोजनांबाबत शासनाकडे पाठपुरावा करूनही याबाबत राज्य सरकार गांभीर्याने लक्ष देत नाही.
सध्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत असून पंचगंगा नदीपात्रात मृत माशांचा खच पडू लागला आहे. जवळपास दोन टनांहून अधिक मासे मृत पडलेले आहेत. कावीळ व साथीच्या आजाराने पंचगंगा नदीकाठावरील नागरिकांचे आरोग्य पुन्हा धोक्यात येणार आहे.
डिसेंबरनंतर नदीतील पाण्याचा विसर्ग कमी होऊ लागतो, यामुळे साखर कारखाने, कोल्हापूर महापालिका, शिरोली, हातकंणगले, इचलकरंजी औद्योगिक वसाहतीमधील पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीत सोडले जात आहे. कारखानदार व प्रदूषण विभागातील अधिकारी यांची मिलीभगत असल्याने प्रदूषण विभागाकडून नोटीस देऊनही कोणतीच कार्यवाही केली जात नाही.
उपाययोजना करण्याऐवजी विविध संघटनांकडून आंदोलन केल्यानंतर अधिकाऱ्यांमार्फत कार्यकर्त्यांवर ३५३ सारखे गुन्हे दाखल केले जात आहेत. यामुळे शासनाने मंत्रालयस्तरावर प्रदूषणाबाबत उपाययोजना करण्यासंदर्भात तातडीची बैठक घेण्याची विनंती पालकमंत्री केसरकर यांना केली. या वेळी पालकमत्र्यांनी पुढील आठवड्यात बैठक घेण्याचे आश्वासन दिले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.