पिंपळकोठे ग्रामपंचायतीकडून ‘पेपरलेस’ करवसुली

जिल्ह्यात प्रथमच ‘क्यूआर कोड’च्या माध्यमातून होणार कामकाज
Digital Tax Collection
Digital Tax CollectionAgrowon

अंबासन, ता. सटाणा : ग्रामपंचायतीचा कारभार (Gram Panchayat Governance ) म्हटला, की अनेक जण समज-गैरसमज करतात. ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक असावा, या अनुषंगाने पिंपळकोठे (ता. सटाणा) ग्रामपंचायतीने पेपरलेस करवसुली (Paperless Tax Collection ) प्रणाली तयार केली आहे. त्यानुसार प्रत्येक करदात्याला मोबाइल अॅपद्वारे कराचा भरणादेखील करता येणार आहे. अशाप्रकारे कर भरणा करून घेणारी जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत असून, ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक असावा या उद्देशातून हा उपक्रम हाती घेतल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाकडून बोलले जाते.

पिंपळकोठे गावाची लोकसंख्या २ हजार ३३२ आहे. प्रत्येक घरावर ग्रामपंचायतीच्या कर वसुलीसाठी ‘क्यूआर कोड’ लावण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचा सर्व व्यवहार पारदर्शकपणे पार पाडला जाणार आहे. त्यातून ग्रामपंचायतीत कुठल्याही कराचा भरणा करण्यासाठी थेट रक्कमही हाताळली जाणार नाही. शिवाय गावकऱ्यांकडून थेट बँकेतच कराचा भरणा होणार असल्याने ग्रामपंचायतीचा कारभारदेखील पारदर्शक होणार आहे. दरम्यान, करदात्यांना कराची थकीत रक्कम तसेच घराचा उतारा, कराची भरायची रक्कम आदी सुविधा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर दिसून येते.

...असे आहेत क्यूआर कोडमुळे होणारे फायदे

गावातील सर्व घरांवर क्यूआर कोड ग्रामपंचायतीच्या खातेदाराचे नाव व घर क्रमांकासह लावल्यास ग्रामपंचायत कर्मचारी नऊ नंबर रजिस्टर न घेता फक्त मोबाइलने स्कॅन करून सदर खातेदाराकडे किती बाकी आहे हे बघू शकतात. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे काम सहज व सोपे होते. घरपट्टी, पाणीपट्टी वसुली अधिक जलद गतीने होण्यास मदत होते. यासाठी ग्रामपंचायतीस अतिशय अल्पदरात क्यूआर कोड उपलब्ध करून देण्यात आला आहे. नऊ नंबर तयार करून अगदी सोप्या पद्धतीने प्रणालीवर माहिती समाविष्ट करता येते. नऊ नंबरच्या एंट्री पूर्ण झाल्यावर सहा दिवसांत क्यूआर कोड ग्रामपंचायतीला मिळतील.

ग्रामीण भागातही डिजिटल क्रांती झाली पाहिजे या उद्देशातून करदात्याकडून ग्रामपंचायतीचा स्वनिधी कसा प्राप्त होईल यासाठी क्यूआर कोड तयार करून यशस्वी होत आहोत.
किशोर भामरे, सरपंच, पिंपळकोठे
आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे क्यूआर कोड तयार करून प्रत्येक घरावर चिटकवला आहे. करदात्याला मोबाइलवर कर भरता येणार आहे. ग्रामपंचायतीचा विकास होण्यासाठी आम्ही ‘ई-पेपरलेस ग्राम’ संकल्पना राबविली आहे.
योगेश भामरे, ग्रामसेवक, पिंपळकोठे
ग्रामपंचायत करवसुली खूप कमी प्रमाणात होत होती. त्यात कर्मचाऱ्यांचा ताण कमी व्हावा यासाठी सरपंच, ग्रामसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली क्यूआर कोडची संकल्पना आखली यात करदात्यांकडूनही प्रतिसाद मिळत आहे.
महेश जगताप, संगणक परिचालक, पिंपळकोठे

---------

------------

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com