
नाशिक : ‘कृषी उडान योजना २.०’ची (Krishi Udan Scheme) जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात उत्पादित होणारा शेतीमाल (Agriculture Produce) देश-विदेशात पोहोचविण्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालय व कृषी विभागासह इतर सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने नियोजन करावे, अशा सूचना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharati Pawar) यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी उडान योजनेबाबत झालेल्या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार या दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून बोलत होत्या. या बैठकीस जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, कृषी उपसंचालक कैलास शिरसाठ, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम उपस्थित होते. तर नवी दिल्ली नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे सचिव राजीव बन्सल, पुणे कृषी आयुक्तालयाचे संचालक डॉ. कैलास मोते, पणन महामंडळाचे चंद्रशेखर बारी, जिल्हा पणन अधिकारी बी. पी. देशमुख, नाशिक एअरपोर्ट कार्गो वाहतूकचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश बंजन, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, सह्याद्री फार्मा प्रोड्यूसर कंपनीचे विलास शिंदे दूरदृश्यप्राणालीद्वारे उपस्थित होते.
डॉ. पवार म्हणाल्या, की जिल्ह्यात कृषी व अकृषी स्वरूपाच्या हंगामी उत्पादित होणाऱ्या शेतीमालास देशात व विदेशात चांगली मागणी आहे. यासाठी जिल्ह्यातील शेतकरी, शेतीमाल उत्पादक कंपन्यांना कृषी उडान योजनेबाबत मार्गदर्शन करून या योजनेचा अधिकाधिक लाभ होण्यासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात यावे. याकरिता वेळोवेळी या योजनेशी संबंधित विभाग, शेतकरी व शेतीमाल उत्पादक कंपन्यांच्या समवेत बैठकीचे आयोजन करावे, असे निर्देशही त्यांनी जिल्हा प्रशासनास दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी कृषी उडान योजना ही नाशिक जिल्ह्यासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. भारती पवार यांनी बैठकीत आभार मानले.
जिल्हाधिकारी गंगाथरन डी. म्हणाले, की कृषी उडान योजनेशी संबंधित सर्व विभागांच्या बैठका घेऊन जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या हंगामनिहाय शेतीमालाच्या निर्यातीत सातत्य ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील. या बैठकीदरम्यान नवी दिल्ली नागरी हवाई वाहतूक विभागाचे सचिव राजीव बंसल यांनी कृषी उडान योजनेची सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले.
उत्पादन निर्यातीसाठी हवाई मार्ग निश्चित करावेत
जिल्हा कृषी उत्पादनात अग्रेसर असल्याने कृषी उडान योजनेच्या माध्यमातून हवाई मार्गाद्वारे शेतीमालास जागतिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या सहकार्याने कृषी विभाग व जिल्ह्यातील शेतीमाल उत्पादक कंपन्यांनी एकत्रितपणे मागणी असलेल्या प्रदेशात व देशात उत्पादन निर्यातीसाठी हवाई मार्ग निश्चित करावेत. जेणेकरून जिल्ह्यात उत्पादित झालेला दर्जेदार व ताजा शेतीमाल वेळेत हवाई मार्गाने आवश्यक स्थळी पोहोचविणे शक्य होईल, असेही डॉ. पवार यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.