
कुंडल, जि. सांगली ः क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड साखर कारखान्यांमार्फत (Sugar Mill) आता सॅटेलाइट मॅपिंगद्वारे (Satellite Mapping) ऊसतोडणी (Sugarcane Harvesting) नियोजन करण्याचा प्रयोग करण्यात येणार आहे. अध्यक्ष आमदार अरुण लाड (MLA Arun Lad) यांच्या उपस्थितीत या साठीचा करार कारखाना व महिंद्रा ‘कृषी-ई’ यांच्यात झाला.
सध्या सुरू असलेल्या गाळप हंगामात या सॅटेलाइट मॕपिंगद्वारे ऊसतोडणीचे नियोजन करण्याचा प्रयोग करण्यात येणार आहे. कारखान्यास उच्चतम साखर उतारा मिळण्यासाठी पक्वतेनुसार ऊसतोडणी दिली जाते. पक्वता समजण्यासाठी प्रचलित पद्धतीमध्ये शेती खात्यामार्फत विभागवार लागण अथवा खोडवा तारखेनुसार उसाचे प्रातिनिधिक सॅम्पल काढले जातात.
हे सॅम्पल वाहनातून कारखाना स्थळावर आणून उत्पादन विभागाकडील प्रयोगशाळेमध्ये साखर उतारा तपासला जातो. अपेक्षित साखर उतारा मिळालेल्या प्लॉटचा प्राधान्यक्रम ठरवून ऊसतोडणी कार्यक्रम दिला जातो. या पद्धतीमध्ये सॅम्पल काढणे, वाहतूक करणे, सॅम्पल पृथक्करणासाठी लागणारी केमिकल्स, यासाठी बराचसा वेळ व श्रम लागतात आणि खर्चही बराच होतो.
करार करतेवेळी कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्हाणे, सचिव अप्पासाहेब कोरे, दिलीप पार्लेकर, विलास जाधव, मंदार गडगे, उद्योजक आर. के. सावंत-पाटील, संदीप पवार, अमोल गरूड व संचालक मंडळ, तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सॅटेलाइट मॅपिंग’ची वैशिष्ट्ये
- सॅटेलाइटमधील मल्टिस्पेक्ट्रम कॅमेऱ्याच्या मदतीने उसाचे अनेक फोटो घेतले जातात.
- पानांच्या हरितद्रव्यातील रंगांचे पृथक्करण व तपासणी केली जाते
- शेतातील उभ्या उसातील साखर टक्केवारी (पोल इन केन) संगणकावर उपलब्ध होते.
- साखरेच्या टक्केवारीची माहिती दर आठवड्याला समजण्याची सोय
- अपेक्षित साखर टक्केवारी असलेले प्लॉट निवडून तोडणी कार्यक्रम राबविता येतो.
- खर्चात बचत होऊन साखर उतारा वाढण्यास मदत
कारखान्यामार्फत नेहमीच आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केला जातो. यामध्ये शेती खात्याचे कागदविरहित कामकाज, मोबाईल अॕपवर ऊसनोंदणी, ड्रोनच्या साह्याने उसावर फवारणी, असे विविध प्रयोग यशस्वीपणे राबवीत आहोत. मॅपिंगद्वारे ऊसतोडणीचा प्रयोग यशस्वी झाल्यास ऊसतोडणी अधिक पारदर्शक होईल.
- अरुण लाड, अध्यक्ष, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड साखर कारखाना
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.