
यवतमाळ : श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे १३५ फूट उंच सेवाध्वजाची स्थापना, संतश्री सेवालाल महाराज यांचा भारतातील एकमेव पंचधातूंच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण व ५९३ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते रविवारी (ता. १२) रोजी होणार आहे. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या विकासकामांच्या, बंजारा समाजाच्या विविध मागण्यांच्या तसेच कार्यक्रमाच्या अनुषंगाने मंत्रालयात नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, समाजातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक झाली.
संजय राठोड यांच्या पुढाकाराने तीन डिसेंबर २०१८ रोजी भव्य नगारा वास्तू संग्रहालयाचे भूमिपूजन पार पडले होते. सदर वास्तूचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे.
या विकासकामांमुळे बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवीचा चेहरामोहरा बदलणार आहे. १२ फेब्रुवारीच्या या भव्यदिव्य कार्यक्रमाला देशभरातून लाखो बंजाराबांधव, मंत्री, बंजारा समाजातील लोकप्रतिनिधी, संतमहंत उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बंजारा समाजातील हजारो पदाधिकारी, नेते राज्याचे अन्न व औषधी प्रशासनमंत्री संजय राठोड यांच्यासोबत परिश्रम घेत आहेत.
कार्यक्रमासाठी निमंत्रक संजय राठोड यांच्या नेतृत्वात विविध समित्या कार्यरत आहेत. प्रत्येक तांड्यामध्ये कार्यक्रमाचा प्रचार-प्रसार सुरू आहे.
पोहरागड येथील स्थानिक पायाभूत सुविधा व मंदिर सुशोभीकरण, बायोलॉजीकल पार्क तसेच इतर विविध विकासकामांकरिता एकूण ५९३ कोटी रुपये मंजूर झाले आहे.
यामध्ये तीर्थक्षेत्र विकासासाठी ३२६ कोटी, संत रामराव महाराज उद्यानासाठी २०० कोटी व नंगारा वास्तू संग्रहालयाच्या उर्वरित कामासाठी ६७ कोटी रुपये याचा समावेश आहे.
आज पोहोचणार चार रथयात्रा
या कार्यक्रमाच्या आधी देशातील चार मार्गाने सेवादास महाराजांची रथयात्रा सुरू करण्यात आली आहे. कर्नाटकमधील भायागड, तेलंगणामधील सेवागड, मुंबई येथील सांताक्रूझ व मध्य प्रदेशातील शिवाबाबा गड अशा चार ठिकाणांवरून ही रथयात्रा सुरू झाली आहे.
रथयात्रेच्या मार्गात समाजबांधवांकडून रथयात्रेचे प्रचंड स्वागत करण्यात येत आहे. ही रथयात्रा ११ तारखेला वेगवेगळ्या चार मार्गांनी पोहरादेवी येथे पोहोचणार आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.