
बुलडाणा ः जिल्ह्यात या हंगामात नुकसान होऊनही शेतकऱ्यांना अत्यल्प मदत मिळत असल्याचा मुद्दा गाजत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांसह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. २८) दिवसभर ठिय्या आंदोलन केले.
सायंकाळी विमा कंपनीच्या प्रतिनिधीला थेट पोलिस ठाण्यात नेऊन त्या ठिकाणी प्रशासनाने पोलिस तक्रार केल्याने एकच खळबळ उडाली आहे. संपूर्ण चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले होते. आता या प्रकरणी प्रत्येक तालुक्याच्या पोलिस ठाण्यात तक्रारी देऊन हे प्रकरण पुढे नेले जाणार आहे.
या बाबत अधिक माहिती अशी, की जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीकडे भरलेली रक्कम आणि प्रत्यक्षात मिळत असलेला लाभ यात प्रचंड तफावत आहे. या मुद्यावरूनच स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात दिवसभर ठिय्या दिला. विमा कंपनीच्या वरिष्ठांसोबत वारंवार चर्चाही केली.
मात्र, ठोस काही बाहेर येत नसल्याने सायंकाळी विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक दिलीप लहाने यांना गाडीत कोंबून थेट बुलडाणा शहर पोलिस ठाणे गाठले. या ठिकाणी लहाने यांच्यासह जिल्ह्यातील १३ तालुका समन्वयक विरुद्ध पोलिस तक्रार करण्यात आली. बुलडाणा जिल्ह्यात एआयसी ही पीकविमा कंपनी खरीप हंगामासाठी काम करीत आहे.
जिल्ह्यातील रद्द केलेल्या २५ हजार शेतकऱ्यांच्या पीकविमा सूचनांचा पुन्हा आढावा घेण्याची मागणी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मान्य केली. मात्र, ज्यांना अत्यंत तोकडी रक्कम मिळाली त्यांना पुन्हा रक्कम देण्याबाबत उशिरापर्यंत कोणताच तोडगा न निघाल्याने आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली.
भारतीय कृषी विमा कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापक शंकुतला शेट्टी, विभागीय व्यवस्थापक दीपक पाटील, बुलडाणा जिल्हा व्यवस्थापक दिलीप लहाने, बुलडाणा तालुका प्रतिनिधी अमोल गाडेकर, चिखली प्रतिनिधी योगेश लहाने, मोताळा प्रतिनिधी मंगेश गाडेकर,
मलकापूर प्रतिनिधी मनोहर पाटील, मेहकर प्रतिनिधी नंदकिशोर जोगदंडे, लोणार प्रतिनिधी अमोल चव्हाण, देऊळगाव राजा प्रतिनिधी श्रीकृष्णा ढाकणे, सिंदखेड राजा प्रतिनिधी रवींद्र गोरे, खामगाव प्रतिनिधी परमेश्वर खोडके, शेगाव प्रतिनिधी पंकज अरज, संग्रामपूर प्रतिनिधी वैभव गाळकर, जळगाव जामोद प्रतिनिधी प्रसाद वनारे आणि नांदुरा प्रतिनिधी कुंदन सोळंके अशा १६ जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.