राज्यात राजकीय भुकंप; एकनाथ शिंदे नॉट रिचेबल

विधानपरिषदेच्या निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडीला धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर सरकारला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
राज्यात राजकीय भुकंप; एकनाथ शिंदे नॉट रिचेबल
Eknath ShindeAgrowon

विधानपरिषदेच्या निवडणुकीत (MLC Election 2022) सत्ताधारी महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi Government) धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर सरकारला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बंडाच्या पवित्र्यात असून ते सुमारे १३ ते १५ आमदारांसह गुजरातमधील एका हॉटेलमध्ये थांबले असल्याची माहिती मिळाली आहे. शिंदे यांच्यासोबत नेमके किती आमदार (Shivsena MLA) आहेत, हे अजून स्पष्ट झालेले नाही. परंतु या घडामोडीमुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार गडगडणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे आज दुपारी बारा वाजता पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. शिंदे भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विधानपरिषदेच्या निकालानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (CM Udhhav Thackeray) यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक आज दुपारी बोलावली आहे. शिंदे यांच्या बंडाच्या बातमीनंतर महाविकास आघाडीत डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू झाले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सोमवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिल्ली दौरा रद्द केला आहे.

एकनाथ शिंदे हे विधान परिषदेच्या निकालानंतस संपर्कात नसल्याने शिवसेनेची धाकधूक वाढली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपने महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला. भाजपाला राज्यसभेच्या निवडणुकीपेक्षा दहा ते अकरा मतं जास्त मिळाल्याचं मानलं जात आहे. शिवसेना आणि कॉंग्रेसची मते मोठ्या प्रमाणावर फुटली. त्यामुळे राज्य सरकारच्या स्थैयाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं असतानाच एकनाथ शिंदे यांनी नाराजीचा बॉंब टाकल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, विधानपरिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा धक्कादायक पराभव झाल्यामुळे कॉंग्रेस पक्षामध्येही अस्वस्थता आहे. विधिमंडळ पक्षाचे नेते व महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत विधिमंडळ पक्ष नेतेपदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवल्याची चर्चा आहे. तसेच सरकार म्हणून आम्हाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असे सूचक वक्तव्य करून थोरात यांनी एक प्रकारे राज्य सरकारच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. कॉंग्रेसचे नेते आज दिल्लीत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार आहेत. कॉंग्रेसच्या भुमिकेमुळेही राज्य सरकारच्या स्थैयाबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन भाजपवर आरोप केले. भाजप मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु महाराष्ट्रात मध्य प्रदेश पॅटर्न चालणार नाही, असे राऊत म्हणाले. भाजपचा हा घाव छातीवर नसून पाठीवर आहे, असे म्हणत त्यांनी भाजपवर रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप केला आहे. एकनाथ शिंदे हे आमचे जीवाभावाचे सहकारी आहेत, मुुख्यमंत्र्यांबाबत काही गैरसमज झाले असतील तर ते दूर करता येतील, अशी सबुरीची भाषा राऊत यांनी केली. नॉट रिचेबल असलेल्या काही आमदारांशी संपर्क झाला असून शिवसेनेचे नेते एकमेकांच्या संपर्कात आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com