
Poultry Industry Update नागपूर / नाशिक : पशुखाद्यात (Poultry Feed) सतत वाढ होत असल्याने पोल्ट्री व्यवसाय (Poultry Business) अडचणीत आला आहे. एका कोंबडीच्या व्यवस्थापनावर (Poultry Management) ८५ रुपये खर्च येत आहे. विक्री मात्र, ७० रुपयांत करावी लागत असल्याची स्थिती आहे. या शिवाय कुक्कुटखाद्याच्या कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्याचा मोठा फटका बसला आहे.
पिलांच्या दरात घसरण झाली तर उपलब्धता असल्याने संगोपन वाढले आहे. त्यातच सणासुदीच्या काळात मागणी मंदावली. त्याचा फटका दराला बसला. उत्पादन खर्चापेक्षा विक्री दर कमी झाला.
त्यामुळे मागील महिनाभरापासून कुक्कुटपालकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून दरात सुधारणा होत असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
शेतकऱ्यांसाठी पूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालनाकडे पाहिले जात असले तरी सध्या या व्यवसायात अनिश्चितता वाढली आहे.
कोंबड्यांच्या खाद्यात मुख्यतः मका, भुईमूग, सोयाबीन, ज्वारी, बाजरीचा समावेश होतो.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा या खाद्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे कुक्कुटपालक मेटाकुटीला आले आहेत. उन्हाळ्यात पाण्याच्या समस्येमुळे कोंबड्यांना वाचवणे अधिकच जिकरीचे होणार आहे.
यंदा उत्पादन अधिक असल्याने अंडी आणि चिकनचे भाव घसरले आहेत. त्याचवेळी, कोंबड्यांचे खाद्यदर वाढत आहेत.
कोंबड्यांच्या खाद्याचे दर दोन वर्षांपासून चढेच आहेत. त्यामुळे अडचणी येत आहेत. कच्च्या मालाच्या किमतीमुळे धान्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
त्यामुळे कुक्कुट व्यवसायाची अवस्था दयनीय झाली आहे. तसे पाहिल्यास, एक कोंबडी दररोज सुमारे ११० ग्रॅम धान्य खाते आणि १२० ते १५० दिवसांनी अंडी घालू लागते.
‘‘मक्याचे दर वाढले. तर सोयाबीन उत्पादन वाढून ते दर त्याप्रमाणात कमी झाले नाहीत. त्यामुळे कुक्कुटखाद्याच्या संगोपन खर्चात वाढ होत आहे.
तर पिलांच्या किमती ३० रुपयांवरून १७ ते १८ रुपयांवर आल्या. पिलांची उपलब्धता व १२ रुपयांनी दरात घसरण यामुळे संगोपन वाढविण्यात आल्याची स्थिती होती.
मात्र आता दर सुधारत असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे,’’ अशी माहिती महाराष्ट्र पोल्ट्री फार्मर्स व ब्रीडर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष उद्धव अहिरे यांनी दिली.
...असे आहेत दर (रुपये...प्रतिकिलो)
खाद्य...मागील दर...आताचे दर
सोयाबीन पेंड...४५...४७
मका...२१...२३
तांदूळ कणी...१५...२०
शेंगदाणा ढेप...३०...३२
दर सुधारल्याने काहीसा दिलासा
मागीलवर्षी मार्च ते मे दरम्यान दर चांगले मिळाले होते. त्यामुळे कुक्कटपालकांनी उत्पादन अधिक घेतले. मात्र मागणी कमी होऊन पुरवठा वाढल्याने संपूर्ण देशभरात दर कोसळले होते. मात्र गुरुवार (ता.१३) पासून दरात सुधारणा दिसून आली आहे.
दर ८५ रुपये किलोला मिळत असून उत्पादन खर्चाच्या बरोबरीने तो आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर दरात सुधारणा होण्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.