Poultry : शेतकरी नियोजन ः कुक्कुटपालन

सायगाव (जि. नाशिक) येथील सतीश पोपट कुळधर मागील ७ वर्षांपासून करार पद्धतीने कुक्कुटपालन व्यवसाय करत आहेत.
Poultry
PoultryAgrowon

शेतकरी ः सतीश पोपट कुळधर

गाव ः सायगाव, ता. येवला, जि. नाशिक

पक्ष्यांची संख्या ः १३ हजार

सायगाव (जि. नाशिक) येथील सतीश पोपट कुळधर मागील ७ वर्षांपासून करार पद्धतीने कुक्कुटपालन व्यवसाय (Poultry Business) करत आहेत. जून महिन्यात १२ हजार पक्ष्यांची नवीन बॅच घेतली. या बॅचमधील पक्ष्यांचे गेल्या आठवड्यात लिफ्टिंग झाले आहे. पक्षी आणल्यापासून ते लिफ्टिंगपर्यंत प्रामुख्याने पाणी, खाद्य (Poultry Feed) व हंगामनिहाय नियोजन महत्त्वाचे असते. त्यानुसार बॅच सुरू करण्यापूर्वी पक्षिगृह स्वच्छता व निर्जंतुकीकरण (Sanitation) इत्यादी कामांवर भर दिला जातो. यामळे पक्ष्यांची किमान मरतुक, वाढ व विक्री करताना अपेक्षित वजन मिळण्यात फायदा होतो. त्यानुसार विविध कामांचे नियोजन केले जाते. (Poultry Management)

नवीन बॅच सुरू करताना प्रत्येकवेळी शास्त्रीय पद्धतीने कुक्कुटपालनाची पूर्वतयारी केली जाते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पक्ष्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असते. वातावरणातील बदलांचा पक्ष्यांना विविध आजार होण्याचा धोका असते. त्यामुळे योग्य लसीकरण, स्वच्छता, पाणी आणि खाद्य व्यवस्थापन आदी बाबींचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक असते.

Poultry
Poultry : पोल्ट्री व्यवसाय का ठरतोय आतबट्ट्याचा ?

व्यवस्थापनातील बाबी ः

- पिले आणण्यापूर्वी खाद्य व पाण्याची भांडी, चिक फीडर्स स्वच्छ केली जातात.

- चुना मारलेल्या बेडवर भाताचे तूस पसरवून घेतले जाते.

- त्यानंतर करार केलेल्या कंपनीकडून पिले मागवून पुढील बॅच सुरू होते.

- पिलांच्या संख्येनुसार खाद्य आणि पाण्याची भांडी ठेवण्यात येतात.

- पिलांना वेळेच्या वेळी खाद्य पुरविले जाते. खाद्य हे कोरड्या ठिकाणी व उंचीवर ठेवतो.

- पावसाळ्यात पाणी दूषित होण्याची शक्यता असते. कोंबड्यांना स्वच्छ पाणी पुरविण्यासाठी शिफारशीनुसार जंतुनाशके मिसळून पाणी पुरवठा केला जातो. पिल्लांना स्वच्छ आणि निर्जंतुक पाणी उपलब्ध होईल याची काळजी घेतली जाते.

Poultry
देशात Poultry Lifting Rate उत्पादन खर्चापेक्षाही कमी|Chicken Rate|Agrowon | ॲग्रोवन

- पावसाळ्याच्या दिवसांत पक्ष्यांच्या वयानुसार आणि गरजेनुसार शेडमध्ये योग्य तापमान राखणे आवश्यक असते. शेडमध्ये अमोनिया वायूची पातळी वाढल्यास शेडमधील पडदे १ फूट खाली घेतले जातात.

- शेडमध्ये ९० फॅरनहाइटपर्यंत राखले जाते. तापमान नियंत्रणासह हवा खेळती राहण्यासाठी पडद्यांची उघडझाप केली जाते. दिवसाच्या वेळी पाऊस नसेल तेव्हा पडदे उघडले जातात.

- शेडमध्ये माश्यांचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेतो.

- एक बॅच साधारण ४० ते ४५ दिवसांची असते. पक्ष्यांची वाढ पूर्ण झाल्यानंतर कंपनीशी केलेल्या कराराप्रमाणे पक्ष्यांचे वजन करून विक्री होते.

गादी व्यवस्थापन ः

पक्षिगृहात टाकलेले तूस ओले झाल्यामुळे शेडमधील वातावरण दूषित होते. ओलसर गादीमुळे रोगराई झपाट्याने पसरून कोंबड्या विविध आजारांस बळी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळोवेळी ओले झालेले तूस बदलले जाते. गादी कोरडी राहील याकडे विशेष लक्ष दिले जाते.

कोंबडीखत संकलन व विक्री ः

प्रत्येक बॅच गेल्यानंतर तुसावर संकलित झालेले कोंबडीखत गोळा करून शेडबाहेर काढले जाते. शेडमध्ये खत शिल्लक राहणार नाही याची काळजी घेतली जाते. उपलब्ध खताची परिसरातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार विक्री केली जाते. तसेच आवश्यकतेनुसार शेतामध्ये पिकांसाठी वापर केला जातो.

स्वच्छतेवर भर ः

- स्वच्छ आणि दुर्गंधीमुक्त पक्षिगृह यावरच कुक्कुटपालन व्यवसायाचे यश अवलंबून असते. स्वच्छतेच्या निकषांचे काटेकोर पालन केल्यास पक्ष्यांची वाढ आणि आरोग्य उत्तम राहते.

- अस्वच्छतेमुळे पक्षी रोगांना बळी पडण्याची शक्यता असते.

त्यामुळे प्रत्येक बॅच गेल्यानंतर पक्षिगृहाची स्वच्छता केली जाते. पक्ष्यांचे पंख आणि इतर घाण काढून पक्षिगृह स्वच्छ केले जाते. त्यानंतर फवारणी यंत्राच्या साह्याने पाण्याचे फवारे मारून संपूर्ण पक्षिगृह धुऊन स्वच्छ केले जाते.

- रोगप्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पक्षिगृह धुतल्यानंतर लगेच फॉर्मेलिन द्रावणाने निर्जंतुकीकरण केले जाते. त्यानंतर चुना मारून भाताचे तूस पसरवून नवीन बॅचसाठी पक्षिगृह तयार होते.

------

- सतीश कुळधर, ९८२२९५७७११

(शब्दांकन : मुकुंद पिंगळे)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com