Fertilizer
FertilizerAgrowon

खतांच्या वाघिणीला सप्टेंबरपर्यंत प्राधान्य द्या

कृषी आयुक्तांची पत्राद्वारे रेल्वे प्रशासनाकडे मागणी

पुणे ः राज्यात रासायनिक खतांच्या होणाऱ्या पुरवठ्यातील (Fertilizer Supply) अडथळे दूर करण्यासाठी कृषी आयुक्त धीरज कुमार (Dheeraj Kumar) सरसावले आहेत. “शेतकऱ्यांच्या हितासाठी सप्टेंबरपर्यंत खतांच्या वाघिणीला (Fertilizer Wagon) प्राधान्य देण्याच्या सूचना रेल्वेच्या अधिकाऱ्यांना द्या,” अशी मागणी आयुक्तांनी रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे.

आयुक्तांनी रेल्वे प्रशासनाच्या माल व वाहतूक विभागाला पत्र पाठविले आहे. खतापेक्षाही रेल्वेकडून सिमेंट व अन्य सामग्रीच्या वाहतुकीसाठी वाघिणी प्राधान्याने दिल्या जात असल्याचे त्याद्वारे निदर्शनास आणून दिले आहे. “राज्याच्या शेतीत ८० टक्के वाटा खरीप हंगामाचा आहे. १५० लाख हेक्टरवर यंदा खरीप घेतला जात आहे. त्यासाठी सप्टेंबरपर्यंत ४५ लाख टन खते लागणार आहेत. मॉन्सून सर्वदूर सक्रिय होताच जून व जुलैमध्ये खतांच्या मागणीत वाढ होते. त्यामुळे वाघिणींची उपलब्धता वाढवावी,” असे आयुक्तांनी म्हटले आहे.

“रेल्वेकडून इतर वेळी खत वाहतुकीसाठी समस्या येऊ दिल्या जात नाहीत. मात्र यंदा युद्धजन्य स्थितीमुळे जागतिक पातळीवर होत असलेल्या घडामोडी, कच्च्या सामग्रीची होणारी टंचाई, रेक पॉइंट उपलब्ध न होणे अशा विविध कारणांमुळे खतनिर्मिती कंपन्या समस्यांचा सामना करीत आहेत. खतांपेक्षा इतर सामग्रीच्या वाहतुकीला वाघिणी दिल्या जात असल्याचे कंपन्या सांगत होत्या. या गोंधळात खतांची चढ-उतार करण्यास उशीर होत आहे. त्यापोटी रेल्वेकडून दंड लादला जात आहे,” असे आयुक्तालयाचे म्हणणे आहे.


कमी वाघिणींमुळे खतपुरवठ्यात अडचणी

जागतिक घडामोडी विचारात घेता खरिपात सर्व जिल्ह्यांना वेळेत व पुरेशी खते पुरविण्याच्या सूचना केंद्रीय कृषी मंत्रालयाने सर्व राज्यांना केलेल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात गेल्या हंगामापेक्षा जास्त खते पुरविण्याचे नियोजन विविध खत कंपन्यांकडून सुरू आहे. मात्र त्यासाठी वाघिणींची उपलब्धता पुरेशी नाही. त्यामुळे कृषी विभागाने रेल्वेशी पत्रव्यवहार केला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com