मराठवाड्याच्या काही भागांत पावसाची हजेरी

औरंगाबाद जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला, तर विविध ठिकाणी अशाच घटनेत सात जनावरेही दगावल्याची घटना घडली.
मराठवाड्याच्या काही भागांत पावसाची हजेरी
Rains In MarathawadaAgrowon

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड व लातूर या जिल्ह्यांत शनिवारी (ता.११) सायंकाळी पावसाची हजेरी लागली. वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी हलका, तर काही ठिकाणी मध्यम ते दमदार स्वरूपाचा पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला, तर विविध ठिकाणी अशाच घटनेत सात जनावरेही दगावल्याची घटना घडली.

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण, कन्नड, सिल्लोड या तालुक्यांतील अनेक गावांमध्ये कुठे पावसाने जोरदार, तर कुठे हलक्‍या स्वरूपाची हजेरी लावली. जिल्ह्यातील पाचोड, जायकवाडी, विहामांडवा, शिवना, नागापूर, आळंद, आसडी, आदी गाव परिसरांत शनिवारी दुपारी व सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पेरणीची लगबग वाढवीली आहे.

पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथे वीज पडून तरुणाचा मृत्यू झाला. गजानन हरिश्‍चंद्र दराडे (२७) असे त्याचे नाव आहे. सिल्लोड तालुक्यातील सावखेडा जवळील उटाडेवाडी येथेही वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. संजय नथू उटाडे (४५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सिल्लोड तालुक्यातील शिवना परिसरात झालेल्या पावसाने पूर्वहंगामी लागवड केलेल्या मिरची पिकाला जीवदान दिले आहे.

विहामांडवा परिसरात टाकळी अंबड, हिंगणी, रामनगर शिवारांत पाऊस झाला. कन्नड तालुक्यातील नागापूर परिसरात जवळपास एक तास विजांच्या कडकडाटासह जोरदार झालेल्या पावसाने काही शेतकऱ्यांच्या शेतातील बांध फुटले. आळंद परिसरातही तासभर जोरदार पावसाची हजेरी लागली. आसडी येथे वादळासह आलेल्या पावसामुळे काही घरांवरील पत्रे उडून गेली. नाचनवेल परिसरातील आडगाव, ता. कन्नड शनिवारी दुपारी गट नंबर १९७ मध्ये वीज पडून शेतात काम करणाऱ्या मालक महिलांसह मजूर किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली. जालना जिल्ह्यात जालना शहरासह काही ठिकाणी पावसाची हजेरी लागली.

भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे जवळपास एक तास जोरदार पाऊस झाला. याशिवाय सिरजगाव मंडप, गोषेगाव, खंडाळा, निमगाव, रजाळा, पंढरपूरवाडी, देऊळगाव कमान, वजिरखेडा, पारध येथेही पावसाची हजेरी लागली. परतूर शहरासह तालुक्यात वाटुर फाटा परिसरात, तसेच अंबड तालुक्यातील अंकुशनगर, शहागड, पाथरवाला, वडीगोदरी, अंतरवाली, सराटी, नालेवाडी, मंठा तालुक्यातील तळणी आदी ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील परळी, वडवणी, आणि गेवराई तालुक्यात कमी अधिक पाऊस झाला.

परळी तालुक्यातील पिंपरी गावात एका शेतकऱ्याचा सौर कृषिपंपाचे वादळी वाऱ्याचा तडाख्याने मोठे नुकसान झाले. शिरसाळा शहर व परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. वांगी, ता. माजलगाव येथील रंगनाथ महाराज जाधव यांच्या मालकीचा बैल वीज पडून दगावल्याची घटना घडली. लातूर जिल्ह्यातील शिरूर ताजबंद येथे रविवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांत ७३ मिलिमीटर पाऊस झाल्याची माहिती तलाठी यांनी दिली. याशिवाय जळकोट मंडळात २० मिलिमीटर, तर घोणसी मंडळात २ मिलिमीटर पाऊस झाला. शिरूर ताजबंद, ता. अहमदपूर येथे दुपारी चारच्या सुमारास अर्धा तास पाऊस झाला.

पावसाची हजेरी शेत शिवारातील अंतिम टप्प्यात असलेल्या मशागतीच्या कामासह पेरणीच्या कामाची लगबग वाढवून गेली आहे. याशिवाय धूळपेरणी व किमान पाण्यावर लागवड झालेल्या ठिबकवरील कपाशी, मिरची आदी पिकांसाठी हा पाऊस पोषक ठरणार असल्याचे चित्र आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com