राष्ट्रपती, मुख्यमंत्रीही जनतेतूनच करावा:अजित पवार

पवार म्हणाले, ‘‘लोकशाहीत काही परंपरा असतात. १९६७ मध्ये यशवंतराव चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती केली. त्यांनी ही धोरणे ठरवली, तेही दूरदृष्टीचेच नेते होते.
Ajit Pwar
Ajit PwarAgrowon

बारामती, जि. पुणे ः ‘‘जनतेतून फक्त नगराध्यक्ष आणि सरपंचच कशाला तुम्ही राष्ट्रपती (President) आणि मुख्यमंत्रीही (Chief Minister) थेट जनतेतूनच करावा,’’ अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारवर केली. नगराध्यक्ष व सरपंचपद जनतेतून निवडण्याच्या भूमिकेबाबत विचारले असता बारामतीत ते माध्यमांशी बोलत होते. ‘‘या प्रश्‍नाबाबत दोघांच्या मंत्रिमंडळाला खूप घाई झालेली दिसते,’’ अशी टीकाही त्यांनी केली.

पवार म्हणाले, ‘‘लोकशाहीत काही परंपरा असतात. १९६७ मध्ये यशवंतराव चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती केली. त्यांनी ही धोरणे ठरवली, तेही दूरदृष्टीचेच नेते होते. बहुमत ज्या पक्षाला असते त्यांचे खासदार पंतप्रधान ठरवतात.

राज्यातही १४५ आमदारांचा पाठिंबा असलेले मुख्यमंत्री (Chief Minister) होतात. त्याच पद्धतीने याही निवडी होत होत्या. तशाच पद्धतीने नगराध्यक्ष व सरपंचपद निवडले गेले असते तर बरे झाले असते. सरपंच व नगराध्यक्ष इतर विचारांचे असतील तर काय होते याचा अनुभव या पूर्वी घेतला आहे. अधिकाराचे केंद्रीकरण ही बाब लोकशाहीसाठी घातक आहे.’’

‘‘विधिमंडळात हा मुद्दा मांडून चर्चा करून ज्या सूचना येतील त्यांचा विचार करून मगच हा निर्णय घ्यायला हवा होता. प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. आमदारांचे मत यात विचारातच घेतले गेले नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिला, या बाबत आपले दुमत नाही, पण निवडणुकीचा मोठा खर्च बाजार समितीला करावा लागणार आहे. राज्यातील अनेक बाजार समित्या एवढा खर्च पेलू शकणार नाहीत. त्यांना खर्चच झेपणार नसेल, तर मग शासन निवडणूका थांबवणार का’’, असा सवाल पवार यांनी केला.

‘‘नवीन सरकारने बहुमतावर सर्व गोष्टी केल्या, मग मंत्रिमंडळाचा विस्तार का होत नाही. पूरपरिस्थिती असताना तातडीने पालकमंत्री नेमून त्यांच्यावर तेथील जबाबदारी द्यायला हवी. पालकमंत्र्यांनीही सरकारी यंत्रणेला विश्‍वासात घेत उपाययोजना करणे गरजेचे आहे. महापुराचा त्रास होत आहे. दुबार पेरणी करावी लागणार आहे. भातशेतीचे (Paddy)नुकसान झाले आहे. बियाणे नव्याने द्यावे लागेल, जमिनीचे नुकसान झाले त्याचे पंचनामे करावे लागतील. पूरग्रस्तांना मदतीचा हात द्यायला हवा,’’ अशी मागणी पवार यांनी केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com