
ॲग्रोवन वृत्तसेवा
अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात (Kharif Season) सततचा पाऊस, कीड-रोग व कापणीच्या काळातील पावसाने यंदा पिकांच्या उत्पादकतेला मोठा फटका दिला आहे.
मूग, उडीद, ज्वारी, सोयाबीनची उत्पादकता (Productivity) घटल्याचे कृषी खात्याच्या पीककापणी अहवालातून स्पष्ट दिसून येत आहे. मुगाचे अवघी हेक्टरी २६१ किलो उत्पादन निघाले आहे.
म्हणजेच एकरी एक क्विंटलची उत्पादकता निघाली. शेतकऱ्यांना मूग पिकासाठी (Mung Crop) उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक करावा लागला आहे.
खरीप हंगामात जिल्ह्यात मूग, उडीद या पिकांचे सुमारे ४० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र राहते. कमी कालावधीत येणारे हे पीक ओळखले जाते.
मागील काही वर्षांत या दोन्ही पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. यंदाच्या हंगामात अति पाऊस व कीड-रोगाने पिकाचे नुकसान झाले. कृषी खात्याने पीककापणी प्रयोग राबवून त्याद्वारे उत्पादकता काढली. यात मुगाचे हेक्टरी २६१ किलो उत्पादन निघाले.
यातही मूर्तिजापूर तालुक्यात केवळ ६४ किलो ८३३ ग्रॅमच उत्पादन आहे. अकोल्यात ३३५ किलो, बार्शीटाकळी ३१६, अकोट १३०, तेल्हारा १७४, पातूर ३५२ आणि बाळापूर तालुक्यात ३६२ किलो उत्पादन निघाल्याचे अहवालात म्हटले आहे.
उडीद पिकाचे जिल्ह्याचे सरासरी हेक्टरी उत्पादन यंदा ३३९ किलो आले आहे. यातही मूर्तिजापूर तालुक्यात मुगाप्रमाणेच उडदाचे हेक्टरी उत्पादन कमी म्हणजेच हेक्टरी १२१ किलो आहे.
कुठल्याही तालुक्यात पाच क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन झालेले नाही. सोयाबीनचे उत्पादन हेक्टरी १६०९ किलो दाखवले आहे. एकरी सहा क्विंटलपर्यंत सरासरी सोयाबीनची उत्पादकता निघाली आहे. वास्तवात अनेक शेतकऱ्यांना याहीपेक्षा कमी उत्पादन झालेले आहे.
तालुकानिहाय विचार केल्यास अकोला तालुक्यात १५२८ किलो, मूर्तिजापूर १५४८, बार्शीटाकळी १४५२, अकोट १५९७, तेल्हारा १४९६, पातूर १७५० आणि बाळापूरमध्ये १९५२ किलो सोयाबीन उत्पादन निघाले आहे.
ज्वारीचे ५४६ किलो हेक्टरी उत्पादन
गेल्या काही वर्षांत दुर्लक्षित होत असलेले ज्वारीचे पीक यंदा पावसाच्या तडाख्यात सापडले होते. ज्वारीची उत्पादकता त्यामुळे खालावली.
अकोट, तेल्हारा, बाळापूर या तीन तालुक्यांतील पीककापणी प्रयोगाच्या आधारे उत्पादन काढण्यात आले. यात हेक्टरी ५८० किलो उत्पादन निघाले.
अकोला, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, पातूर या तालुक्यांतील उत्पादकता निरंक दाखवण्यात आली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.