तणावग्रस्त शेतकऱ्यांना देणार मानसिक आधार

सामाजिक संघटना, विविध विभागांची चर्चा; जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती
तणावग्रस्त शेतकऱ्यांना देणार मानसिक आधार
Farmer SuicideAgrowon

वर्धा : शेतकऱ्यांना या तणावातून (Stress) मुक्त करून त्यांना धीर देण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आत्महत्येचे (Farmer Suicide) अधिक प्रमाण असणाऱ्या चार प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये ही मोहीम सुरू होत आहे.

जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मोहिमेची रूपरेषा ठरविण्यात आली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राज पराडकर, दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता भिसे, डॉ. खडसे तसेच परिवर्तन सामाजिक संस्थेचे डॉ. हमीद दाभोळकर तसेच मानसोपचार तज्ज्ञ ऑनलाइन उपस्थित होते.

विविध कारणांमुळे तणावात असलेल्या शेतकऱ्यांना धीर देणे आवश्यक असते. यासाठी अशा शेतकऱ्यांचा सर्व्हे गावातच केला जाणार आहे. यासाठी नर्स, आशा, अंगणवाडी सेविका, कृषी सहायक, तलाठी, आत्मामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. यासाठी या सर्वांना विशेष प्रशिक्षण देखील पुढील आठवड्यात दिले जातील. गावामध्ये जे शेतकरी काही कारणास्तव तणावात आहेत किंवा ज्यांची मानसिक स्थिती चांगली नाही, अशा शेतकऱ्यांचा शोध घेऊन त्यांचे प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरच समुपदेशन केले जातील. आवश्यकता भासल्यास औषधोपचार देखील दिला जाणार आहे.

या मोहिमेत आरोग्य विभाग, कृषी विभाग, दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था, वर्धा सोशल फोरम, पुणे येथील डॉ. हमीद दाभोळकर यांची परिवर्तन संस्था या शासकीय व सामाजिक संस्था सहभागी होत आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, तणावग्रस्त शेतकऱ्यांची तपासणी व औषधोपचारासाठी या संस्था मदत करणार आहे. तणावग्रस्त शेतकऱ्यांची ओळख झाल्यानंतर त्यांच्या समुपदेशनासाठी आयुर्विज्ञान संस्थेचे तज्ज्ञ डाॅक्टर्स प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी आपल्या सेवा देतील.

कानगाव, विजयगोपाल, खरांगणा, हमदापुरातून प्रारंभ

समुपदेशनानंतर आवश्यकता भासल्यास औषधोपचार तथा रुग्णालयात दाखल करून उपचार करणे आवश्यक असल्यास तशी सुविधा देखील या अभियानांतर्गत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी मानसोपचार तज्ज्ञांचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे. यावर्षात गत काही दिवसात ज्या भागांमध्ये आत्महत्या घडून आल्या आहे, अशा कानगाव, विजयगोपाल, खरांगणा, हमदापूर या चार प्राथमिक आरोग्य केंद्र व त्याअंतर्गत येणाऱ्या गावांचा अभियानातील पहिल्या टप्प्यासाठी समावेश करण्यात आला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com