साडेतीन हजार शेतकऱ्यांची हरभरा खरेदी लटकली

हरभऱ्यांचे मोजमाप होऊनही पोर्टलवरील नोंदीअभावी शेतकऱ्यांना चुकारे मिळणे तूर्त अशक्य झाले आहे.
साडेतीन हजार शेतकऱ्यांची हरभरा खरेदी लटकली
Harbhara Agrowon

परभणीः मुदतीपूर्वीच खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाले. परिणामी, पोर्टल बंद झाल्यामुळे ‘नाफेड’ची (भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ) हमीभाव हरभरा खरेदी परत एकदा थांबली आहे. त्यामुळे परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील राज्य सहकारी पणन महासंघ अंतर्गतच्या १६ केंद्रांवर नोंदणी केलेल्या ३ हजार ७२८ नोंदणीकृत शेतकऱ्यांची हरभरा खरेदी लटकली आहे.

हरभऱ्यांचे मोजमाप होऊनही पोर्टलवरील नोंदीअभावी शेतकऱ्यांना चुकारे मिळणे तूर्त अशक्य झाले आहे. नाफेडच्या वतीने राज्य सहकारी पणन महासंघाच्या परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १६ केंद्रांवर नोंदणी केलेल्या २३ हजार ३५ पैकी २२ हजार ६० शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर हरभरा घेऊन येण्यासाठी एसएमएस पाठविण्यात आले. त्यापैकी गुरुवार (ता. २) पर्यंत १९ हजार ३०७ शेतकऱ्यांचा २ लाख ६६ हजार ५४५ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली.

त्यात यापूर्वी पोर्टल सुरू झाल्यानंतर या दोन जिल्ह्यांतील ३ हजार २७४ शेतकऱ्यांच्या ४६ हजार २९३ क्विंटल हरभऱ्याच्या खरेदीचा समावेश आहे. या दोन जिल्ह्यांतील खरेदी केंद्रांवरील १ लाख ९७ हजार ११३ क्विंटल हरभरा वखार महामंडळाच्या गोदामात साठविण्यात आला. परंतु अजून ६९ हजार ३६२ क्विंटल हरभरा केंद्रावर पडून आहे.

काही शेतकऱ्यांचा हरभरा वखार महामंडळाच्या गोदामात साठविला आहे. परंतु त्याची नोंद पोर्टलवर नोंद राहिली आहे. तसेच पोर्टलवर नोंद झाली आहे. परंतु वखार महामंडळाच्या गोदामात साठविला नाही. अशा शेतकऱ्यांना चुकारे मिळालेले नाहीत.

शुक्रवार (ता. ३)पर्यंत या दोन जिल्ह्यांतील १० हजार ६७८ शेतकऱ्यांच्या १ लाख ५० हजार २१४ क्विंटल हरभऱ्याचे ७८ कोटी ५६ लाख २१ हजार २०७ कोटी रुपयाचे चुकारे अदा करण्यात आले. अजून ८ हजार ३५९ शेतकऱ्यांचे १ लाख १६ हजार २६१ क्विंटल हरभऱ्याचे ६० कोटी ८० लाख ४५ हजार ३० रुपयांचे चुकारे प्रलंबित आहेत.

गुरुवार (ता. २) पासून पोर्टल बंद झाल्यामुळे खरेदी थांबली. अजून या दोन जिल्ह्यांतील एसएमएस पाठविल्यापैकी २ हजार ७५३ शेतकऱ्यांच्या हरभऱ्याची खरेदी बाकी असून, अद्याप ९७५ शेतकऱ्यांना एसएमएस पाठविलेले नाहीत. दोन्ही मिळून एकूण ३ हजार ७२८ शेतकऱ्यांच्या हरभऱ्याची खरेदी राहिली आहे. केंद्रांवर वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. वाहनभाड्याचा भुर्दंड सोसावा लागत आहे. हरभरा खरेदी उद्दिष्ट वाढवावे. पोर्टल पूर्ववत करावे. शिल्लक शेतकऱ्यांची हरभरा खरेदी करावी. चुकारे तत्काळ अदा करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com