
दोंडाईचा, जि. धुळे ः शिंदखेडा तालुक्यात रब्बी हंगामातील (Rabi Season) पिकांसाठी ३२ हजार हेक्टर क्षेत्राचे लक्ष्य निश्चित केले आहे. दरम्यान, आतापर्यंत २६ हजार हेक्टर क्षेत्रावर पीकपेरा (Rabi Crop Sowing) झाला आहे. सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान यंदा झाले आहे.
रब्बी पिकांना शेवटपर्यंत पाणी पुरणार नाही. त्यामुळे यंदा रब्बी हंगामाचे क्षेत्र कमालीने घटले आहे. तृणधान्य पिकांची पेरणी १६ हजार, तर कडधान्य पिकांची पेरणी नऊ हजार क्षेत्रावर झाल्याचे चित्र आहे. अद्याप सहा हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकाच्या पेरण्या झाल्या नसल्याचे तालुका कृषी विभागाच्या आकडेवारीवरून समजते.
या वर्षी शिंदखेडा तालुक्यातील १४३ गावांत सरासरीपेक्षाही कमी पर्जन्यमान झाल्याची परिस्थिती आहे. नद्या-नाले, ओढे आतापासूनच कोरडेठाक पडले आहेत. जलयुक्त शिवारातील बंधाऱ्यामधील जल कधीपासूनच मुक्त झाले आहे. त्यामुळे बागायतदार शेतकऱ्यांच्या विहिरीत पाणी नाही. जेमतेम उपशावर आलेल्या पाण्यावर रब्बी हंगामाची मदार आहे. मार्च, एप्रिल महिन्यांपर्यंत पिकांना पाणी पुरणार नाही, अशी परिस्थिती शेतकऱ्यांना आजपासूनच दिसत आहे. परिणामी, रब्बी हंगामातील क्षेत्र कमालीचे घटले आहे.
तृणधान्य पिकासाठी शिंदखेडा, चिमठाणा, नरडाणा, दोंडाईचा या चारही कृषी विभागांच्या मंडळांतर्गत रब्बी ज्वारी, मका, गहू या पिकासाठी २२ हजार ९४२ हेक्टर जमिनीचे क्षेत्र निश्चित केले आहे. त्यांपैकी १६ हजार ९८० हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत, तर कडधान्यात हरभरा पिकासाठी नऊ हजार २३६ हेक्टर क्षेत्रापैकी नऊ हजार पन्नास हेक्टर क्षेत्रावर हरभरा पिकाचा पेरा झाला आहे.
सहा हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर तृणधान्याचा अद्याप पेरा झाला नाही. यंदा रब्बी हंगामातील पेरण्या घटणार आहेत, अशी शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे. भुईमूग पिकाच्या लागवडीसाठी शेतकरी मात्र उत्सुक दिसून येत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.